नागपूर : राम मंदिर आंदोलनात संघ सहभागी झाला होता. परंतु, ९ नोव्हेंबर रोज आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. आता संघाला कुठलेही आंदोलन करायचे नाही, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्पष्ट केले.
हिंदूंना वाटते की आता अशा स्थानांचा पुनरुद्धार व्हायला हवा. परंतु आताचे मुस्लीम हे आपल्याच पूर्वजांचे वंशज आहेत. ज्ञानवापीच्या मुद्यावर चर्चेतून मार्ग काढायला हवा. जर न्यायालयात कुणी गेले तर न्यायव्यवस्थेच्या निर्णयाचा आदर झाला पाहिजे, असे ते म्हणाले.
संघाला कुणाच्याही पूजापद्धतीचा विरोध नाही; परंतु कुणीही दुसऱ्यांच्या धर्मपद्धतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करायला नको, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंचावर वर्गाचे सर्वाधिकारी अशोक पांडे, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, महानगर संघचालक राजेश लोया हे प्रामुख्याने उपस्थित होते. वर्ग कार्यवाह ख्वाई राजेन सिंह यांनी प्रास्ताविकात वर्गाबाबत माहिती दिली.
हिंदू-मुस्लिमांनी अतिवादी लोकांना टोकावे
देशाला विश्वगुरू बनविण्याचा मार्ग एकता व समन्वयातून जातो. जे लोक फाळणीनंतर पाकिस्तानात गेले नाही, त्यांनी येथील परंपरेशी व संस्कृतीशी समरस व्हायला हवे. त्यांनी विखार निर्माण करायला नको. एकमेकांना धमक्या देणे दोन्ही धर्माच्या लोकांनी टाळले पाहिजे. दोन्ही धर्मातील लोकांनी आपल्यातील अतिवादी लोकांना टोकायला हवे, असे सरसंघचालकांनी सांगितले.
रशिया शक्तिशाली म्हणूनच इतर देशांची मध्यस्थी नाही
आपल्या शक्तीचा गर्व झाला की ती उपद्रवी बनण्याचा धोका निर्माण होतो. रशियाने युक्रेनवर हल्ला केला व जगभरातून निंदा झाली. परंतु युक्रेनमध्ये जाऊन रशियाला थांबविण्याची कुणामध्ये हिंमत नाही. कारण रशिया शक्तिशाली आहे, याची सर्वांना जाण आहे. भारताने या स्थितीत संतुलित भूमिका घेतली आहे व ती कौतुकास्पद आहे. जर भारतात हवी तशी शक्ती असती तर हे युद्ध होऊच दिले नसते. या युद्धामुळे भारतासमोरील सुरक्षेचे व आर्थिक पातळीवरील आव्हान निश्चितपणे वाढविले आहे, असे सरसंघचालक म्हणाले.