नागपूर : दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना स्वाईन फ्लूनेही आता डोकेवर काढले आहे. नागपूर जिल्ह्यात सहा रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे घाबरून न जाता अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
स्वाईन फ्लूची ओळख २००९ मध्ये झाली. त्यावर्षी नागपूर विभागात आजाराने ४५ रुग्णांचे बळी घेतले होते. त्यानंतर २०१० मध्ये ५४ मृत्यूची नोंद झाली. मात्र, २०११ ते २०१४ पर्यंत मृत्यूची संख्या अर्ध्याहून कमी झाली. परंतु २०१५ मध्ये या आजाराचा प्रकोप वाढला. विभागात सर्वाधिक ७९० रुग्ण व १७९ रुग्णांचे जीव गेले. २०१६ मध्ये ७८ रुग्ण व दोनच रुग्णांच्या मृत्यूची नोंद होती. मात्र, २०१७ मध्ये ऐन उन्हाळ्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली. ६३४ रुग्ण तर ११९ बळी गेले. २०१८ मध्ये ६३ रुग्ण व ११ मृत्यूची नोंद तर २०१९ मध्ये ३६१ रुग्ण व ३९ मृत्यू झाले. २०२०मध्ये कोरोनाला सुरुवात होताच एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. २०२१ मध्ये सहा रुग्णांची नोंद असताना मागील सात महिन्यांतच सहा रुग्ण आढळून आले आहेत.
-शहरात पाच तर ग्रामीणमध्ये एक रुग्ण
स्वाईन फ्लूचे शहरात पाच तर ग्रामीणमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे. महानगरपालिकेचे नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सांगितले, मे महिन्यात तीन, जून महिन्यात सहा तर १० जुलैपर्यंत एक असे सहा रुग्णांचाी नोंद झाली आहे. या सर्व रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-स्वाईन फ्लूचीही तपासणी करून घ्या
स्वाईन फ्लूची लक्षणे कोरोनासारखीच असतात. यामुळे कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली तरी नागरिकांनी खबरदारी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने स्वाईन फ्लूची चाचणी करून घ्यावी. मास्क वापरणे, गर्दीचे ठिकाण टाळणे व वारंवार हात धुणे आवश्यक आहे.
-डॉ. गोवर्धन नवखरे, नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) मनपा
-ही आहेत लक्षणे
:: ताप (१०० अंश फॅरन्हाइट किंवा त्याहून जास्त)
:: खोकला
:: सर्दी
:: थकवा
:: अंगदुखी
:: डोकेदुखी
:: घसा खवखवणे किंवा दुखणे
:: थंडी भरून येणे