सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनामुळे ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण कमी झाल्याने आधीच अडचणीत आलेल्या शासकीय रक्तपेढ्यांना आता रक्त पिशव्यांच्या तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. सध्या डेंग्यूमुळे दोन्ही रक्तपेढीत रोज २५ ते ३० प्लेटलेट्सची मागणी होत आहे; मात्र पिशवीच नसल्याने प्लेटलेट्स देणार कसे, हा प्रश्न आहे. परिणामी, रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
डेंग्यू व डेंग्यूसदृश आजाराचे घराघरांत रुग्ण दिसून येत आहेत. या आजारावर अँटिबायोटिक किंवा अँटिव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. डेंग्यूचा गंभीर रुग्णांमध्ये शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याचा धोका असतो. जेव्हा ‘प्लेटलेट्स काऊंट १५ हजार प्रती मायक्रोलिटरपेक्षा खाली येतात तेव्हा त्याला ‘लो प्लेटलेट्स’ मानले जाते. अशावेळी रुग्णाला ‘रँडम डोनर प्लेटलेट्स’ (आरडीपी) किंवा ‘सिंगल डोनर प्लेटलेट्स’ (एसडीपी) दिले जाते. परंतु, कोरोनामुळे रक्तदानाची मोहीम थंडावल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा पडला आहे. यातच प्लेटलेट्स देण्यासाठी मेयो, मेडिकलमध्ये पिशव्याच (बॅग) नसल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. गरीब रुग्णांवर पदरमोड करून खासगी रक्तपेढीतून प्लेटलेट्स आणण्याची वेळ आली आहे.
-ट्रिपल बॅगच्या मागणीत वाढ
एका रक्तदात्याचा रक्तातून लाल पेशी, ‘प्लेटलेट्स’, ‘प्लाझ्मा’ अशा तीन घटकांना वेगळे करता येते. यासाठी ट्रिपल बॅगची गरज पडते. सूत्रानूसार, कोरोनामुळे या बॅगच्या उत्पादनावर प्रभाव पडला आहे. कोरोना कमी होताच रक्त व रक्तघटकांच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठादारांकडून कमी पुरवठा होत असल्याची माहिती आहे.
-वर्षभरापासून ‘एमएसएसीएस’तर्फे पुरवठा बंद
शासकीय रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांना महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेतर्फे (एमएसएसीएस) रक्त पिशव्यांचा पुरवठा केला जातो. परंतु, कोरोनामुळे मागील वर्षभरापासून मेयो व मेडिकलच्या रक्तपेढ्यांना या संस्थेतर्फे पिशव्यांचा पुरवठाच झाला नाही. यामुळे दोन्ही रुग्णालयांवर या बॅग विकत घेण्याची वेळ आली आहे. मेयोने संबंधित पुरवठादाराकडे बॅगची मागणी केली आहे. परंतु, त्याच्याकडून अद्याप पिशव्या उपलब्ध झाल्या नाही, तर मेडिकलने बॅगचा खरेदीसाठी निविदा मागविल्या आहेत. परंतु, यात १५ दिवसांवर कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत रक्तपेढी बंद करायची का, असा प्रश्न आहे.