नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमध्ये देखील विद्यार्थ्यांना आता 'स्टार्टअप' करता येणार आहे. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधन करता यावे म्हणून विद्यापीठाने इंक्युबेशन केंद्र सुरू करण्याबाबत महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार केला आहे. सुरुवातीला नागपूर जिल्ह्यातील १३ महाविद्यालयांमध्ये इंक्युबेशन केंद्र सुरू केले जाणार आहे.
स्थानिक सामाजिक गरजा लक्षात घेऊन नैसर्गिक संसाधनांचा वापर करून विद्यार्थ्यांना रोजगाराची साधने उपलब्ध व्हावी म्हणून कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने इंक्युबेशन केंद्र सुरू केले आहे. विद्यापीठाच्या या इंक्युबेशन केंद्रातून विद्यार्थ्यांनी अनेक नावीन्यपूर्ण संशोधन करीत 'स्टार्टअप' केले आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेले मशीन येथील उद्योजकांनी देखील वापरणे सुरू केले आहे. एवढेच नव्हे संरक्षण क्षेत्रातील दारुगोळा ट्रॅकिंग प्रणाली देखील विद्यापीठाच्या इंक्युबेशन केंद्रातील विद्यार्थ्यांनी तयार केली.
याप्रमाणेच महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना देखील स्वयंरोजगाराच्या वाटा शोधता याव्यात म्हणून संलग्नित महाविद्यालयांमध्ये देखील इंक्युबेशन केंद्र सुरू केले जात आहे. याबाबत संलग्नित महाविद्यालयांसोबत विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचार्य मंडळाने सामंजस्य करार केला आहे. यावेळी नवोपक्रम, नवसंशोधन व साहचार्य मंडळाचे संचालक डॉ. राजेश सिंग, इंक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. अभय देशमुख व संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रतिनिधी उपस्थित होते.
विद्यापीठ इंक्युबेशन केंद्रामार्फत महाविद्यालयात सुरू होत असलेल्या केंद्रातील विद्यार्थ्यांची ज्ञानाच्या देवाण-घेवाणसह क्षमता वाढ केली जाईल. महाविद्यालयीन इंक्युबेशन केंद्राचे सक्षमीकरण करणे, संशोधन आणि विकासाची तरतूद करणे, बौद्धिक मालमत्ता आणि मालमत्ता व्यापारीकरणाचे धडे देणे, तांत्रिक सहाय्य देणे, इंटर्नशिप कार्यक्रम राबविणे, वेळापत्रक प्रशिक्षण आणि क्षमता वाढ करणे, माहितीची देवाणघेवाण व सहयोग, मार्गदर्शक दुवा आणि कौशल्य विशिष्ट मार्गदर्शन, तंत्रज्ञान आणि ज्ञानाची देवाणघेवाण, सहयोगी प्रयत्नांचा विस्तार, फॅकल्टी प्रतिबद्धता आणि कौशल्य सामायिकरण यासह विविध बाबींचा सामंजस्य करारामध्ये समावेश करण्यात आला आहे.
या महाविद्यालयांमध्ये होणार स्टार्टअप
नागपूरातील सेंट व्हिन्सेंट पॅलोटी कॉलेज, दादासाहेब बालपांडे कॉलेज, प्रियदर्शनी जे एल कॉलेज, तायवाडे कॉलेज, तायवडे कॉलेज ऑफ फार्मसी, एस एस मणियार कॉलेज ऑफ कम्प्युटर, जे आय टी कॉलेज, एस. बी जैन कॉलेज रिसर्च अँड इन्स्टिट्यूट, कवी कुलगुरू इन्स्टिट्यूट रामटेक, श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज कामठी, एस.चंद्रा महिला महाविद्यालय गोंदिया यांचा समावेश आहे.