नागपूर : पूर, भूकंप आदींसारख्या नैसर्गीक आपत्तीची माहिती आधीच मिळाली तर व त्या रोखता येऊ शकतात. होणारे नुकसान टाळता येऊ शकते. यादृष्टीने मदत व पुनर्वसन विभागाने पुढाकार घेत एक ‘सॅटेलाईट’(उपग्रह) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शुक्रवारी येथे दिली.
नागपुरात गेल्या २३ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते नागपुरात आले होते. आढावा घेतल्यानंतर पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली. अनिल पाटील यांनी सांगितले की, नैसर्गीक आपत्तीत जीवित हानी व मालमत्तांचे बरेच नुकसान हाेते. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहे. त्यादृष्टीने विभागाचा स्वत:चा ‘सॅटेलाईट’ तयार करण्यात येणार आहे.
भूगर्भातील घडामोडी, हवामान, पाऊस आदींबाबत किमान २४ तासापूर्वी तसेच जास्तीत जास्त एक आठवड्यापूर्वी याद्वारे माहिती उपलब्ध होऊ शकते. यासाठी एका शास्त्रज्ञाची नियुक्ती केली जाईल. तसेच कृषीसह विविध विभागांना या उपग्रहाचा फायदो होऊ शकोत, अशा सर्व विभागांना सुद्धा यात सहभागी करून घेतले जाईल. हा उपग्रह लॉंच करायला दीड ते दोन वर्षे लागतील, असेही त्यांनी सांगितले.
- प्रत्येक गावात प्रथमोपचार किट
नैसर्गीक आपत्तीच्या काळात एखाद्याला रूग्णालयात हलवण्याची वेळ आलीच तर त्यापूर्वी दवाखान्यात पोहोचेपर्यंत प्राथमिक उपचार मिळणे आवश्यक असते. तसे झाले नाही. त्याचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळे गावपातळीवर अशा प्रथमोपचाराची किट उपलब्ध करून देण्याचा निर्णयही मदत व पुनर्वसन विभाग घेत असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले.
- गल्लीबोळात जाण्यासाठी अग्नीशमन बाईक
अग्नीशमनाच्या गाळ्या या गल्लीबोळात जाऊ शकत नाही. त्यामुळे अनेकदा अशा ठिकाणी घटना घडली तर त्यांना तातडीने मदत मिळत नाही. त्यामुळे अशा गल्लीबोळाच्या ठिकाणी जाण्यासाठी अग्नीशमन बाईक तयार करण्याची योजनाही मदत व पुनर्वसन विभाग तयार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.