लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये (केबीसी) २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगून बँकेचा अकाऊंट नंबर व आयएफएससी कोड विचारून लुबाडणूक करणारे कॉल पूर्वी मोबाईलवर यायचे, आता जवळीक वाढविण्यासाठी ‘व्हॉटस्अॅप’वरून कॉल येत असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे.सामाजिक कार्यकर्ता रोशन इंगळे यांना गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान ‘व्हॉटस्अॅप’ कॉल आला. ‘केबीसी’मध्ये तुम्हाला २५ लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, अशी बतावणी केली. त्या व्यक्तीने राणा प्रतापा सिंग यांना कॉल करा, असे सांगून व्हॉटस्अॅपवर नंबर पाठविला. या नंबरवर साधा कॉल लागत नाही. व्हॉटस्अॅपवर कॉल जातो. इंगळे यांनी त्याच्याशी संपर्क साधल्यावर त्या व्यक्तीने अत्यंत लाघवी भाषेत प्रथम कौतुक केले. तुम्हाला ही रक्कम मिळणारच, याची खात्री दिली. कुठलीही लुबाडणूक होणार नाही, याची शाश्वती दिली. लॉटरीची रक्कम काही मिनिटात तुमच्या खात्यात जमा होईल. तुम्ही ‘लखपती’ व्हाल, असे आमिष दाखविले. पैसे जमा करण्यासाठी अकाऊंट नंबर सांगा, सोबतच ‘आयएफएसएसी’ कोडही लागेल, असे सांगून तो आग्रह करू लागला. परंतु इंगळे यांनी अकाऊंट नंबर सांगण्यास आढेवेढे घेऊ लागल्याचे पाहत, तुम्ही तुमच्या २५ लाखांवर पाणी फेरत आहात, असे म्हणत, फोन बंद केला. इंगळे यांनी याबाबत पोलिसांना याची माहिती दिली; सोबतच नागरिकांनी अशा कॉलपासून सावध राहण्याचेही आवाहन केले.