नागपूर : शहर, ग्रामीण व पूर्व आरटीओ कार्यालयात लावण्यात आलेल्या सिम्युलेटरवर आता परीक्षा देऊनच पर्मनंट लायसन्स मिळणार आहे. विशेष म्हणजे, नापास होणाऱ्यांनाही या सिम्युलेटर म्हणजे, संगणक यंत्रणेवरील आभासी वाहन चालविण्याचे यंत्रणेवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, वाहन चालविताना त्यांच्या हातून अपघात होऊ नयेत, या उद्देशाने परिवहन विभागाने प्रत्येक राज्यातील आरटीओ कार्यालयात ६५ सिम्युलेटर यंत्र स्थापन केले आहेत. त्यासाठी रस्ता सुरक्षा निधीतून ३ कोटी ९० लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालय व पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात प्रत्येकी दोन सिम्युलेटर लावण्यात आले आहे. शहर ‘आरटीओ’मध्ये लर्निंग लायसन्स टेस्ट कक्षाच्या बाजूच्या खोलीत हे सिम्युलेटर स्थापन केले आहे. तिन्ही आरटीओ कार्यालयात याची सुरुवात झाली आहे; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गरजू उमेदवारांचीच त्यावर परीक्षा घेतली जात आहे.
-काय आहे सिम्युलेटर
सर्व रस्त्यांवर प्रत्यक्ष वाहन चालविण्याच्या प्रत्यक्ष अनुभवाऐवजी संगणक यंत्रणेवरील आभासी वाहन चालविण्याची ‘सिम्युलेटर’ ही यंत्रणा आहे. वाहन चालविताना चालकाला पाऊस, घाटाचा रस्ता, चढ-उतार, हायवे, बोगदा, कच्चा रस्ता अशा वेगवेगळ्या परिस्थितीतून वाहन चालविण्याची टेस्ट या ‘सिम्युलेटर’वर घेतली जाते. चालक या मशीनच्या ड्रायव्हिंग सीटवर बसल्यानंतर तो कसे वाहन चालवितो याचे संगणक ‘रेकॉर्डिंग’ होते. चालकाने केलेल्या चुकांचीदेखील नोंद होते. वाहन चालविणे संपल्यानंतर त्याचा अहवाल येऊन चालकाच्या चुका कळतात.
-अपघातावर नियंत्रण मिळण्यास मदत
वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी आणि आत्मविश्वास वाढविणारी सिम्युलेटर म्हणजे संगणक यंत्रणेतील आभासी वाहन चालवण्यिाची नवीन यंत्रणा आहे. सिम्युलेटरची चाचणी सक्तीची नाही; परंतु वाहन चालकास गर्दीच्या ठिकाणी, तीव्र उतार आल्यावर किंवा गतिरोधक आल्यानंतर वाहन चालविण्याचा आत्मविश्वास या यंत्रणेतून मिळणार आहे. या यंत्रणेमुळे वारंवार होणाऱ्या अपघातावर नियंत्रण मिळण्यास मदत होईल.
-रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर शहर