मोहपा : मोहपा नगर परिषद हद्दीतील अनेक मोक्याच्या आणि मोकळ्या जागांचे सौंदर्यीकरण करून ग्रीन जीमची उभारणी करावी आणि हायमास्ट दिवे लावावेत, अशी मागणी पालिकेचे माजी उपाध्यक्ष माधव चर्जन यांनी केली आहे. शहराच्या हद्दीत पोलीस चौकीसमोर मोठी त्रिकोणाकृती जागा आहे. त्या जागेचे सौंदर्यीकरण करून हायमास्ट दिवे लागण्याची जुनी मागणी प्रलंबित आहे. पोलीस चौकीसमोर लोहगड आणि कोहळीकडून येणारे दोन रस्ते आणि शहरात जाणारे दोन रस्ते असा वर्दळीचा चौक आहे. बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयासमोरील चौकही वर्दळीचा असून तेथे हायमास्ट दिवे लावण्याची गरज आहे. सोबतच शहरातील सर्वात मोठ्या गळबर्डी चौकाचे सौंदर्यीकरण करून हायमास्ट दिवे लावण्याची आवश्यकता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीकच्या पाण्याच्या टाकीखालचा परिसर, गळबर्डी भागातील पाण्याच्या टाकीखालची मोकळी जागा, पेयजल शुद्धीकरण संयंत्राखालील मोकळी जागा या ठिकाणी ग्रीन जीमची उभारणी करून सौंदर्यीकरण करण्याची गरज आहे. संत गजानननगरातील ‘ओपन स्पेस’चा तातडीने विकास करण्याची गरज आहे. नव्याने निर्माण होत असलेल्या महिला कौशल्य विकास केंद्राच्या इमारत परिसराला संरक्षक भिंत बांधून तेथेही ग्रीन जीमची उभारणी आणि सौंदर्यीकरण करण्याची गरज आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना फिरण्यासाठी सुरक्षित जागा तयार होऊन लहान मुलांच्या खेळण्याची हक्काची जागा निर्माण होऊ शकते. यादृष्टीने न.प. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून मोकळ्या जागांचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
न.प. क्षेत्रातील मोकळ्या जागांचे सौंदर्यीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:14 AM