नागपूर : राज्यातील सर्व कुलगुरूंच्या व शिक्षणमंत्र्यांच्या बैठकीत उन्हाळी परीक्षा ‘ऑफलाइन’ माध्यमातून घेण्यावर एकमत झाले; परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अद्यापही भूमिका जाहीर केलेली नसून विद्यार्थी संघटनांकडून परत आंदोलने करण्यात येत आहेत. शुक्रवारी ‘एनएसयूआय’ने ‘ऑनलाइन’ परीक्षांच्या मागणीसाठी परत एकदा आक्रमक पवित्रा घेतला. विद्यापीठाच्या विरोधात निदर्शेने देत कार्यकर्त्यांनी विद्यापीठ बंद केले. आश्चर्याची बाब म्हणजे एरवी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना परिसरातदेखील प्रवेश न देणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाकडून आंदोलनकर्त्यांना सिनेट सभागृहात बसण्यासाठी खुर्च्यादेखील देण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
मागील काही काळापासून ‘ऑनलाइन’, ‘ऑफलाइन’चा वाद तापला आहे. ‘एनएसयूआय’ने अगोदरदेखील ‘ऑनलाईन’ परीक्षांच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. शुक्रवारी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात ‘एनएसयूआय’च्या शेकडो कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर धडक दिली. कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला व त्यानंतर थेट सिनेट सभागृहात निदर्शने केली. विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाइन माध्यमातून झाले असताना ऑफलाइन परीक्षा का घेण्यात येत आहेत, असा सवाल यावेळी विचारण्यात आला. जर ‘ऑनलाईन’ परीक्षा झाल्या तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलकांची संख्या लक्षात घेता कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व विद्यार्थी हित लक्षात घेऊनच निर्णय होईल, असे आश्वासन दिले.
सिनेट सभागृहापर्यंत प्रवेश कसा ?
एरवी विद्यापीठात आंदोलनकर्त्यांना प्रवेशद्वारावरच थांबविण्यात येते. मात्र शुक्रवारी ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांना थेट सिनेट सभागृहापर्यंत प्रवेश देण्यात आला. एरवी एखादा विद्यार्थी कामाने विद्यापीठात गेल्यावर त्याला थांबविण्यात येते. मात्र विद्यापीठाविरोधात आंदोलन करणाऱ्यांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येणे ही बाब आश्चर्यात टाकणारी आहे, असा सवाल सिनेट सदस्य विष्णू चांगदे यांनी उपस्थित केला.
राज्यपालांचीदेखील भेट
युवक काँग्रेस व ‘एनएसयूआय’च्या पदाधिकाऱ्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीदेखील भेट घेतली. विद्यार्थ्यांची परीक्षा ‘ऑनलाइन’ माध्यमातून घेण्यात यावी, असे यावेळी राज्यपालांना निवेदन देण्यात आले.