पालकमंत्र्यांचा पुढाकार : विद्यार्थ्यांना काढण्यासाठी केला रेल्वे इंजिनचा वापरनागपूर : शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची बस पुरामुळे तारसा जॉर्इंट येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अडकून पडली होती. याबाबत पालकमंत्र्यांना माहिती मिळताच त्यांनी मौदा एनटीपीसीच्या महाप्रबंधकांना सूचना केली. पुरामुळे कोणतेही वाहन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची शाश्वती नसताना एनटीपीसीने चक्क रेल्वे इंजिनचा वापर करण्याचा निर्णय घेतला आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत अधिकारी पोहोचले. सुमारे तासाभरातच २०० विद्यार्थ्यांना तेथून काढण्यात यश आले. त्या सर्व विद्यार्थ्यांची भोजन आणि निवासाची व्यवस्था एनटीपीसीने केली. मौदा येथील दोन शाळांमध्ये रामटेक आणि परिसरातील विद्यार्थी येतात. नेहमीप्रमाणे गुरुवारीही विद्यार्थी शाळेत आले. शाळा सुटल्यानंतर २०० विद्यार्थी परत जाण्यासाठी बसमध्ये चढले. ही बस तेथून पुढे निघाली. मात्र मौदा-रामटेक मार्गावरील तारसा जॉर्इंटनजीक येताच रस्त्यावर पाणी असल्याने बस पुढे जाऊ शकली नाही. परत जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी होते. त्यामुळे तेथेच बस अडकून पडली. त्यात असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळे धडकी भरली. २०० विद्यार्थी तारसा जॉर्इंटजवळ बसमध्ये अडकून पडल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळताच त्यांनी जिल्हा प्रशासनासह एनटीपीसीचे महाव्यवस्थापक व्ही. थंगापंडियन यांना मदत करण्याचे निर्देश दिले. मात्र सर्वच रस्ते पुरामुळे बंद झाले होते. त्या रस्त्यांवर पाणीच पाणी होते. परिणामी कोणतेच वाहन तेथे पोहोचण्याची शक्यता नव्हती. अशात थंगापंडियन यांनी विद्यार्थ्यांना तेथून आणण्यासाठी रेल्वे इंजिनचा आधार घेण्याचे ठरविले. त्यानुसार रेल्वे इंजिन चाचेरपर्यंत नेले. सायंकाळी ६ वाजतापासून ते विद्यार्थी तेथेच अडकून होते. साधारणत: तासाभरातच त्या सर्व २०० विद्यार्थ्यांना रेल्वेच्या इंजिनवर चारही बाजूने बसवून एनटीपीसी मौदा येथे आणण्यात आले. सायंकाळी ७ वाजतापर्यंत हे अभियान एनटीपीसीने राबविले. एनटीपीसी येथील भवन्स विद्यालयात त्यांची भोजन आणि निवास व्यवस्था करण्यात आली. जवळपास ५० विद्यार्थ्यांच्या पालकांनी आतापर्यंत तेथून विद्यार्थ्यांना नेले. उर्वरित १५० विद्यार्थी अजूनही भवन्समध्येच आहेत, अशी माहिती महाव्यवस्थापक थंगापंडियन यांनी दिली. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच हे शक्य झाले. यासाठी महाव्यवस्थापक थंगापंडियन यांच्यासह सहायक महाव्यवस्थापक प्रवीण गर्ग, परिहार, प्रशांत तसेच इतर अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. (जिल्हा प्रतिनिधी)
२०० विद्यार्थ्यांसाठी धावली ‘एनटीपीसी’
By admin | Published: August 14, 2015 3:18 AM