लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एप्रिल व मे महिन्यात ७० हजाराहून अधिक गेलेली सक्रिय रुग्णसंख्या आता बरीच कमी झाली आहे. बुधवारी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही २७०० हून कमी झाली होती. पुढील काही दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी होईल, असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात ८१ नवे बाधित आढळले. जिल्ह्यातील बाधितांची टक्केवारीदेखील घटली असून, चाचण्यांच्या तुलनेत हा आकडा ०.७६ टक्के इतकाच आहे.
बुधवारी जारी झालेल्या अहवालानुसार, नागपूर शहरात ४२ तर जिल्ह्यात ३६ नवे बाधित आढळले. जिल्ह्यात पाच जणांचे मृत्यू नोंदविण्यात आले. यातील शहरातील दोन व जिल्ह्याबाहेरील तिघांचा समावेश होता. ग्रामीणमध्ये सलग तिसऱ्या दिवशी एकही मृत्यूची नोंद झाली नाही.
बुधवारी जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ६७६ इतकी होती. यातील २ हजार १६३ रुग्ण शहर तर ५१३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यातील १ हजार ७१ रुग्ण विविध सरकारी व खासगी रुग्णालयात दाखल असून, १ हजार ६०५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
चाचण्यांची संख्या वाढली
नागपूर जिल्ह्यात बुधवारी चाचण्यांची संख्यादेखील वाढली. २४ तासात १० हजार ६३५ चाचण्या झाल्या. शहरात ७ हजार ८२२ तर ग्रामीण भागात २ हजार ८१३ चाचण्या झाल्या. मंगळवारी जिल्ह्यात ८,९२६ चाचण्या झाल्या होत्या.
कोरोनाची बुधवारची स्थिती
दैनिक चाचण्या: १०,६३५
शहर : ४२ रुग्ण व २ मृत्यू
ग्रामीण : ३६ रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण :४,७६,०८८
एकूण सक्रिय रुग्ण : २,६७६
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,६४,४३४
एकूण मृत्यू : ८,९७८