काटोल/कुही/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड/कामठी/रामटेक : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाधितांच्या संख्येत घट होत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यांतील ३१४२ नागरिकांच्या चाचण्यांपैकी ६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दोन रुग्णांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला, तर २६९ कोरोनामुक्त झाले. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १६३७ इतकी आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या १,४२,२०२ इतकी झाली आहे. यातील १,३७,८६५ कोरोनामुक्त झाले, तर २२९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
हिंगणा तालुक्यात १७९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे ४, सावंगी आसोला २, तर निलडोह येथील एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या ११,९४५ झाली आहे. यातील ११,६१३ उपचाराअंती बरे झाले, तर २७२ रुग्णांचा मृत्यू झाला.
कामठी तालुक्यात १३० चाचण्यांपैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कुही तालुक्यात १६२ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात मांढळ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिवणी येथे २, तर पचखेडी येथे एका रुग्णाची नोंद झाली.
कळमेश्वर तालुक्यात ५ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प.क्षेत्रातील ३, तर ग्रामीण भागात चौदामैल व खापरी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात दोन रुग्णांची नोंद झाली. दोन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तालुक्यात आतापर्यंत ६,५२४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यातील ६,३३३ रुग्ण बरे झाले तर १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या १९१ इतकी आहे. उमरेड तालुक्यातील ग्रामीण भागात दोन रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुका कोरोनामुक्तीकडे
एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या काटोल तालुक्याची वाटचाल सध्या कोरोनामुक्तीकडे आहे. तालुक्यात २२० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.