लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संस्थात्मक अलगीकरण कक्षात किंवा रुग्णालयात दाखल असलेल्या संशयितांचे नमुने पॉझिटिव्ह येत असल्यामुळे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास शासनाला काही प्रमाणात यश आले आहे. नागपुरात सोमवारी आणखी सात संशयितांचे तर यवतमाळ जिल्ह्यात एका संशयिताचा नमुना कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. या रुग्णांसह विदर्भात एकूण रुग्णांची संख्या १३७ वर पोहचली आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ११, ३५ व ६० वर्षीय महिला तर ३५ व ४० वर्षीय पुरुषाचे नमुने पॉझिटिव्ह आले. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) प्रयोगशाळेत ३३ वर्षीय पुरुषाचा तर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) प्रयोगशाळेत नागपुरातील एका १३ वर्षीय मुलाचा तर यवतमाळ जिल्ह्यातील २३ वर्षीय युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला. नागपुरातील सात रुग्ण हे संस्थात्मक अलगीकरण कक्षातील आहेत. तर यवतमाळमधील एक रुग्ण हा शासकीय रुग्णालयात काही दिवसापासून भरती होता. नागपुरात रुग्णांची संख्या ८० झाली असून, यातील १२ रुग्ण बरे तर एकाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १८ झाली आहे. यातील नऊ रुग्ण बरे झाले आहेत. अकोला जिल्ह्यात १६ रुग्ण असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात २१ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील एकाचा मृत्यू तर आठ बरे झाले आहेत. गोंदिया व वाशिम जिल्ह्यात एक-एक रुग्णाची नोंद असून, गोंदिया जिल्ह्यातील बाधित रुग्ण बरा झाला आहे.
CoronaVirus in Vidarbha : विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या १३७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 9:29 PM
संस्थात्मक अलगीकरण कक्षात किंवा रुग्णालयात दाखल असलेल्या संशयितांचे नमुने पॉझिटिव्ह येत असल्यामुळे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास शासनाला काही प्रमाणात यश आले आहे. नागपुरात सोमवारी आणखी सात संशयितांचे तर यवतमाळ जिल्ह्यात एका संशयिताचा नमुना कोरोनाबाधित असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. या रुग्णांसह विदर्भात एकूण रुग्णांची संख्या १३७ वर पोहचली आहे.
ठळक मुद्देनागपुरात सात, तर यवतमाळमध्ये आणखी एका रुग्णाची नोंद