लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. बुधवारी आणखी सहा नमुने पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. तर विदर्भात रुग्णांची संख्या १५४ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसात नागपूर वगळता इतर जिल्ह्यात एकाही कोरोनाबाधिताची नोंद झाली नाही. यामुळे आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) मंगळवारी रात्री ४० वर्षीय व ३३ वर्षीय महिला दाखल झाली. या दोघांनाही ताप, खोकल्याची लक्षणे होती. रात्री यांचे नमुने तपासण्यासाठी पाठविले असता सकाळी या दोघांचे नमुने पॉझिटिव्ह आले. धक्कादायक म्हणजे, हे दोन्ही रुग्ण क्वारंटाइन नव्हते. यातच हे रुग्ण जिथे बाधित रुग्ण नाहीत त्या टिमकी आणि कमाल चौक परिसरातील आहेत. प्रशासनाने या दोन्ही वसाहती सील केल्या आहेत. यांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करणे सुरू केले आहे. या शिवाय, मेडिकलमध्ये मगळवारी रात्री ६६ वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे. ही १७ एप्रिलपासून आमदार निवासात क्वारंटाइन होती. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) मंगळवारी रात्री तपासलेल्या नमुन्यात नागपुरातीलच तीन रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात ८० वर्षीय वृद्ध, २५ वर्षीय पुरुष व पाचवर्षीय मुलगा आहे. हे तिन्ही रुग्ण सतरंजीपुऱ्यातील रहिवासी आहेत. वसाहतीतूनच त्यांना लागण झाल्याचे सांगण्यात येते. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागपूर लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता आहे.अमरावतीमधील ३१, यवतमाळमधील सहा नमुने निगेटिव्हएम्सने आज बुधवारी रात्री ८ वाजेपर्यंत ५८ नमुने तपासले. यात नागपुरातील १३, अमरावती जिल्ह्यातील ३७, यवतमाळ जिल्ह्यातील सात तर चंद्रपूर जिल्ह्यातील एका नमुन्याचा समावेश होता. यातील नागपुरातील १३, अमरावतीमधील ३१, यवतमाळमधील सहा तर चंद्रपूरमधील एक असे एकूण ४९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले.
विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या १५४
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 11:17 PM
विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. बुधवारी आणखी सहा नमुने पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. तर विदर्भात रुग्णांची संख्या १५४ वर पोहचली आहे.
ठळक मुद्देनागपूर शंभरीकडे : दोन दिवसात इतर जिल्ह्यात बाधिताची नोंद नाही