नागपूर : कोरोनाचा दैनंदिन रुग्णसंख्येसोबतच आजाराची भीतीही कमी होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे, आठवड्याभरात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. या कालावधीत सर्वात कमी, ७१ नव्या रुग्णांची भर पडली. शनिवारी ९ रुग्ण आढळून आल्याने नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,९२,८१३ तर मृतांची संख्या १०,११५वर स्थिरावली आहे.
कोरोनाने वाढवलेली चिंता आता राहिलेली नाही. दर आठवड्याला रुग्णसंख्येत मोठी घट दिसून येत आहे. ‘आयसीएमआर’ व ‘कोविड १९’ पार्टलमध्ये नोंदीतील गडबडीचे कारण पुढे करीत १,०७६ रुग्णांचे मृत्यू व १५,३०६ रुग्णांची भर पडली असलीतरी मागील आठवड्यात १२२ नवे रुग्ण आढळून आले. तर ८ रुग्णांचे मृत्यू झाले. त्या तुलनेत या आठवड्यात दुप्पटीने रुग्ण कमी झाले. शनिवारी ६,८०० चाचण्या झाल्या. त्या तुलनेत ०.१३ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरात आज २, ग्रामीण भागात ६ तर जिल्हाबाहेरील १ रुग्णाची नोंद झाली. २१ रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण वाढून ९७.९० टक्क्यांवर पोहचले. आतापर्यंत ४,८२,४५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
-विविध रुग्णालयात ५७ रुग्ण
कोरोनाची दुसरी लाट जेव्हा तीव्र होती तेव्हा बाधितांना रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले होते. आता रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या बेडच्या तुलनेत एक टक्काही रुग्ण नाहीत. शनिवारी विविध शासकीय व खासगी रुग्णालयात ५७ रुग्ण उपचाराखाली होते. १८७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते.
:: कोरोनाची शनिवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ६८००
शहर : २ रु ग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ६ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,९२,८१३
ए. सक्रिय रुग्ण : २४४
ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,४५४
ए. मृत्यू : १०११५