फहीम खान ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या १४ दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात शहर व ग्रामीण भागातही कोविड-१९ संक्रमितांची संख्या वेगाने कमी होत आहे. कमी टेस्ट करीत असल्याने कमी रुग्णसंख्या दिसत असल्याचा आरोप होत आहे, मात्र प्रशासनाने आकडेवारी देत चाचण्या खूप कमी होत नसल्याचे स्पष्ट केले आहे. आता तर शहरात मोबाईल कोविड तपासणी केंद्रही सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे आणखी चाचण्या वाढण्याची शक्यता आहे.
नागपूर शहर आणि ग्रामीण भागात ऑगस्ट महिन्याच्या अंतिम आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या प्रथम आठवड्यात संक्रमितांची संख्या वेगाने वाढली होती. ज्या वेगाने संक्रमितांचे प्रमाण वाढत होते त्या प्रमाणात सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात ते कमी होताना दिसून येत आहे. सर्वात समाधानकारक बाब म्हणजे गेल्या दहा दिवसात शहरातील संक्रमितांचा आकडा हजाराच्या खाली येत आहे. १८ सप्टेंबरला शहरात १,४४९ रुग्ण आढळून आले होते.
त्याच्या दुसºयाच दिवशी ही संख्या १,२५३ वर आली. २० सप्टेंबरला ९९३ रुग्ण आढळले होते. मात्र २१ सप्टेंबरला अचानक संक्रमितांचा आकडा १,०२३ वर वाढला. परंतु २२ सप्टेंबरपासून शहरात संक्रमित रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे. संख्या घटत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे. संक्रमण कमी होताना दिसत असल्याने चाचणी केंद्रांवर टेस्ट करणाऱ्यांची गर्दी पूर्वीप्रमाणे दिसून येत नाही. याच कारणानेही चाचण्यांचा आकडा कमी दिसून येत आहे.