०७०७०५३८१५९ क्रमांकाचा फोन कॉल : हिसकावून घेऊ शकतो जीवनभराची कमाई नागपूर : सर नमस्कार, एटीएम व्हेरिफिकेशन सर्व्हिसमध्ये आपले स्वागत आहे. मी मुंबई हेडक्वॉर्टरमधून बोलत आहे. केवायसी फॉर्म जमा न केल्यामुळे आपली एटीएम सेवा बंद करण्यात आली आहे. ती पुन्हा सुरू करायची असेल तर प्लीज आपला कार्ड नंबर, त्यावर नोंदविलेली व्हॅलिडिटी आणि मागे दिलेला सीव्हीसी नंबर सांगा, त्यानंतर एटीएमचा क्रमांक सांगा.होय, काहीशा अशाच पद्धतीने लोकांची जीवनभराची कमाई काही सेकंदात लंपास करण्याचा धंदा शहरात वाढला आहे. पूर्वी विदेशातून याप्रकारे फोन कॉल येत होते. परंतु आता शेजारी राज्यातूनही बोगस फोन कॉलच्या माध्यमातून लोकांचे बँक डिटेल्स घेऊन आॅनलाईन रुपये लुटले जात आहेत. यासंदर्भातील अनेक तक्रारी आल्यावर लोकमतने सोमवारी सायंकाळी ७.३० वाजता ०७०७०५३८१५९ या क्रमांकावर कॉल केला. सर्वप्रथम एका बँकेचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीने एखाद्या कॉल सेंटरमधील प्रशिक्षित कर्मचाऱ्याप्रमाणे नमस्कार केला. त्यानंतर पुढचा श्वास घेण्यापूर्वीच त्याने ‘मी मुंबई हेडक्वॉर्टरमधून बोलत आहे. केवायसी फॉर्म जमा न केल्याने आपला बँक एटीएम लॉक करण्यात आला आहे. तो पुन्हा सुरू करायचा असेल तर एटीएमवर नोंदविलेले १६ डिजीट नंबर सांगा. आम्हीसुद्धा या बोगसपणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी चुकीचे १६ क्रमांकाचे नंबर सांगितले. त्यानंतर त्या व्यक्तीने आम्हाला कार्डच्या व्हॅलिडिटी आणि कार्डच्या मागे असलेल्या सीव्हीसी नंबरची माहिती विचारली. ती दिल्यानंतर काही मिनिटे लाईनवर राहण्यास सांगितले (कदाचित तेव्हापर्यंत तो इंटरनेटवर बँक डिटेल तपासून पाहत होता.) आम्हीसुद्धा सर्व क्रमांक चुकीचे सांगितले होते. त्यामुळे तो वारंवार सांगत होता की तुम्ही दिलेले नंबर बरोबर नाहीत. कृपया बरोबर नंबर सांगा. त्यानंतर अगोदर पिन नंबर देण्यास सांगितले. आम्ही त्याला पिन क्रमांकही खोटा सांगितला. शेवटी त्या व्यक्तीने हार मानत फोन कापला. (प्रतिनिधी)शासकीय नियम आहेत्या व्यक्तीला जेव्हा आम्ही विचारले की न विचारता बँकेने आमचे एटीएम लॉक का केले. यावर त्याने सांगितले की, केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियम आहेत. जर मार्च २०१६ पर्यंत केवायसी फॉर्म जमा केले नाहीत तर तुमचे एटीएम हेडक्वॉर्टर लॉक करेल. सावध राहालोकमततर्फे शहरातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. याप्रकारे कुठल्याही बोगस फोन कॉलबाबत सावधगिरी बाळगावी. कुठल्याही व्यक्तीने आपल्याला एटीएम किंवा बँक खाते लॉक करण्याबाबत सांगितले तर त्याला बँक किंवा एटीएम कार्डबाबत कुठलीही डिटेल माहिती देऊ नये. लगेच आपल्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा आणि पोलिसांनाही सूचना द्यावी.
हा नंबर धोक्याचा!
By admin | Published: May 24, 2016 2:41 AM