बालाजी देवर्जनकरनागपूर : दरवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांच्या संख्येत केंद्र सरकारने मोठी घट केली आहे. पूर्वी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या तुलनेत ही संख्या अर्ध्यापेक्षाही कमी झाली आहे. पूर्वी पावणेचारशे शिक्षक या पुरस्काराने गौरविले जात होते. आता मात्र ही संख्या दीडशेपेक्षाही कमी होणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्र राज्याला २९ राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिले जायचे. आता नव्या निकषानुसार राज्याच्या वाट्याला केवळ ६ पुरस्कार येणार आहेत. पुरस्कारसंख्या घटविल्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.केंद्र सरकारच्या मानव संसाधन विभागाने नुकतेच राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात अनेक फेरबदल केले असून आॅनलाईन प्रस्ताव सादर करण्यासह काही महत्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह बिहार, गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, ओरिसा, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या ११ मोठ्या राज्यांना प्रत्येकी ६ पुरस्कार दिले जातील. तर आंध्रप्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गोवा, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, झारखंड, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालंड, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल या १८ राज्यांना प्रत्येकी ३ पुरस्कार दिले जातील. केंद्रशासित प्रदेशामध्ये केवळ दिल्लीला दोन तर उर्वरित अंदमान निकोबार, चंडीगड, दादरा नगर हवेली, दीव दमण, लक्षद्वीप, पुडुचेरीना प्रत्येकी १ एक पुरस्कार मिळेल. केंद्र सरकारद्वारे संचालित केंद्रीय व नवोदय विद्यालय, सीबीएससी शाळांना १७ पुरस्कार दिले जाणार आहेत. असे एकूण १४५ पुरस्कारांचे वितरण केंद्र सरकार या शिक्षक दिनापासून करणार आहे. पूर्वीच्या तुलनेत ही संख्या खूपच कमी आहे. गतवर्षीपर्यंत देशातील ३७८ शिक्षकांना पुरस्काराने सन्मानित केले जायचे. आता ही संख्या अर्ध्यापेक्षा खाली आल्याने देशातील तब्बल २३३ शिक्षकांना पुरस्कारांपासून मुकावे लागणार आहे.सध्या पुरस्कार संख्येत झालेले बदल हे छोट्या राज्यांच्या पथ्यावर पडले असून, मोठ्या राज्यांना मात्र याचा मोठा फटका बसला आहे. गोवासह अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या ईशान्येकडील राज्यांना पूर्वीपेक्षा प्रत्येकी एक पुरस्कार वाढवून मिळणार आहे. महाराष्ट्र २३, उत्तर प्रदेश २२, पश्चिम बंगाल २०, तामिळनाडू १९, आंध्रप्रदेश १५, गुजरात, केरळ १०, कर्नाटक ९, मध्यप्रदेश, राजस्थान ८, आसाम, हरयाणा, ओरिसा, उत्तराखंड ५, छत्तीसगड, पंजाब ५, बिहार ३, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, झारखंड १ असे पुरस्कार कमी झाले आहेत. त्यामुळे ८ राज्यांना प्रत्येकी एक पुरस्काराचा फायदा झाला असला तरी २१ राज्यांचे १७५ पुरस्कार मात्र हिरावून घेतले आहेत.पहिल्यांदाच घटली पुरस्काराची संख्या१९५८-५९ सालापासून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दिले जातात. त्यात १९६७-६८, १९७६, १९९३, २०००-०१, २००७, २०१४मध्ये अनेक बदल झाले आहेत. पण आतापर्यंत झालेले बदल हे पुरस्कारांच्या संख्येत किंवा पुरस्कार राशी वाढविण्यासाठी झाले आहेत. या वर्षी होवू घातलेले बदल पहिल्यांदा पुरस्कारांची संख्या कमी करण्यासाठी होत आहेत.मानव संसाधन विकास मंत्री महाराष्ट्राचे असताना...सध्या केंद्रात मानव संसाधन विकासमंत्री महाराष्ट्राचे प्रकाश जावडेकर आहेत. केंद्रात महाराष्ट्रीयन व्यक्ती मंत्री असतानाच महाराष्ट्रील सर्वाधिक पुरस्कार कमी व्हावेत, याबाबत शिक्षण वतुर्ळातून आश्चर्यासह संतापही व्यक्त होत आहे.