नागपूर : राज्यातील संरक्षित क्षेत्रामध्ये वाघांची संख्या अधिक आहेच, पण असंरक्षित क्षेत्रातही वाघांची संख्या चांगलीच वाढली आहे. संरक्षित क्षेत्राच्या तुलनेत असंरक्षित क्षेत्रामध्ये निम्मे वाघ असल्याची आकडेवारी वनविभागाकडे आहे. मानव-वन्यजीव सहजीवनाचे पोषक वातावरण आणि वन व्यवस्थापनाच्या नियोजनाचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्रातील चार प्रादेशिक विभागात असलेल्या संरक्षित क्षेत्राबाहेर तब्बल १०७ वाघांची नोंद घेण्यात आली आहे. मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा, ताडोबा -अंधारी आणि बोर या ५ व्याघ्र प्रकल्पांत १८८ वाघ असल्याची नोंद आहे. तसेच पैनगंगा, टिपेश्वर, उमरेड- पवनी-कºहांडला या तीन अभयारण्यात १७ असे मिळून २०५ वाघ संरक्षित क्षेत्रात आहेत. तर संरक्षित क्षेत्राबाहेरील ब्रह्मपुरी, चंद्रपूर, मध्य चांदा, नागपूर, जळगाव, सावंतवाडी यासह अन्य असंरिक्षत क्षेत्रात १०७ वाघ असल्याची नोंद घेण्यात आली आहे. असंरक्षित क्षेत्रात निम्मे वाघ असल्याचे या दोन्ही आकडेवारीवरून स्पष्ट होते.
प्रत्यक्षात असंरक्षित क्षेत्रात अधिवास वाढल्यास प्राण्यांच्या शिकारी होणे तसेच वन्यजीव संघर्षाच्या घटना वाढतात, असा अनुभव आहे. मात्र, अशाही परिस्थितीत महाराष्ट्रातील असंरक्षित क्षेत्रात वाघ वाढत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.
महाराष्ट्रात मध्य प्रदेशपेक्षा अधिक वाघ -मध्य प्रदेशातील असंरक्षित क्षेत्रातील वाघांपेक्षा महाराष्ट्रातील वाघांची संख्या अधिक आहे. २०१८ च्या गणनेमध्ये मध्य प्रदेशात बांधवगड, कान्हा, पन्ना, पेंच, डुंबरी, सातपुडा या व्याघ्र प्रकल्पात ३१८ वाघ दिसले होते. कुनो राष्ट्रीय उद्यानात १ तर रातपानी अभयारण्यात २७ असे एकूण २८ वाघ तेथील संरक्षित क्षेत्रात दिसले. तसेच, बालाघाट, बारघाट, भोपाळ, छत्तरपूर, देवास, मंडला, उत्तर पन्ना, दक्षिण पन्ना, शहडोला, उमरिया या ११ प्रादेशिक विभागाच्या संरक्षित क्षेत्राबाहेर ७८ वाघांची नोंद घेण्यात आली होती.
२०५ - संरक्षित क्षेत्रात१०७ - असंरक्षित क्षेत्रातअसंरक्षित क्षेत्राबाहेर तब्बल १०७ वाघांची नोंद घेण्यात आली आहे.