लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकातर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे नवीन ११ केंद्र उघडण्यात आले आहेत. त्यामुळे आता शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या ८३ झाली आहे.
नवीन ११ केंद्रांमध्ये बुधवारपासून सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत येथे ६० वर्ष वयापेक्षा जास्त नागरिकांना व ४५ ते ५९ वर्षांपर्यंतच्या विविध आजाराने ग्रस्त नागरिकांचे लसीकरण केल्या जाईल. यासाठी त्यांना डॉक्टरकडून विहित नमुन्यात प्रमाणपत्र आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण नि:शुल्क आहे आणि खासगी रुग्णालयांमध्ये शासकीय नियमाप्रमाणे २५० रुपये दर आकारले जात आहे.
आतापर्यंत १७ शासकीय रुग्णालयांमध्ये तसेच ५५ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केल्या जात आहे. तसेच मनपाच्या झोन कार्यालयांमध्येसुद्धा नोंदणीची नि:शुल्क व्यवस्था आहे. नोंदणी केल्यामुळे लसीकरणासाठी जास्त वेळ रुग्णालयात थांबण्याची गरज नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
असे आहेत नवीन केंद्र
इंदोरा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, कपिलनगर नागरी आरोग्य केंद्र, पारडी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, शांतिनगर प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, हंसापुरी आयुर्वेदिक दवाखाना, नंदनवन प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, बाबुळखेडा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, मानेवाडा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, खामला आयुर्वेदिक दवाखाना, स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र आणि आयुष रुग्णालय सदर यांचा समावेश आहे.