मनपा प्रशासन करणार नियोजन : दोन शिफ्टमध्ये होणार लसीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोविड लसीकरणासाठी शहरातील लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेता, मनपाच्या झोन कार्यालयातून ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था नाही, अशांकरिता मनपातर्फे विशेष व्यवस्था केली जाणार आहे. शहरात सध्या शासकीय १४ व खासगी १८ अशा ३२ ठिकाणी लसीकरणाची सुविधा आहे. तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. दररोज वाढ होत आहे. लसीकरणाचा आकडा दहा हजारापर्यंत वाढविण्यासाठी महापालिका प्रशासन नियोजनाला लागले आहे.
सध्या सकाळी ९ ते ५ या दरम्यान केंद्रावर लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी केंंद्रावर नागरिकांची होणारी गर्दी विचारात घेता, लसीकरण दोन शिफ्टमध्ये करण्याचा विचार आहे. सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंत लसीकरण सुरू ठेवण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र याला चार-पाच दिवस लागतील. यासंदर्भात शासकीय रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी चर्चा करणार असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
......
५० हजार डोज उपलब्ध
लसीकरणासाठी ५० हजार डोज उपलब्ध आहेत. सध्या दररोज ३ हजाराच्या आसपास लसीकरण होत आहे. लसीकरणाचा वेग वाढल्यानंतर गरजेनुसार डोजची शासनाकडे मागणी केली जाणार आहे. मागणीनुसार पुरवठा होत आहे. तसेच तातडीची गरज भासलीच तर दुसऱ्या जिल्ह्यातून लस मागविता येईल, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
........
नागरिकांनी गर्दी करू नये
ऑनलाइंन नोंदणी केलेल्या सर्वांना लस दिली जाईल. तसेच ऑफलाईन नोंदणी करणाऱ्या ५० नागरिकांना केंद्रावर लस दिली जाणार आहे. शासन निर्देशानुसार मागणीनुसार सर्वांना लस दिली जाणार आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.