निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारीदरम्यान आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस याना एकीकडे कोरोना योद्धा म्हणून सन्मान करायचा आणि दुसरीकडे त्यांच्या सेवेवरून संशय व्यक्त करून अस्पृश्यतेची वागणूक द्यायची, ही कसली मानसिकता? होय, असा संतापजनक प्रकार नागपुरात घडलाय. गणेशपेठ पोलीस स्टेशनअंतर्गत कर्नलबाग येथे एका भाडेकरू परिचरिकेला (नर्स) घर खाली करण्यासाठी मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.सदर परिचारिका या डागा रुग्णालयात सेवारत आहेत. त्या गेल्या चार महिन्यांपासून कर्नलबाग येथील निवासी संजय भागवत यांच्याकडे भाड्याने राहत आहेत. याबाबत त्यांनी गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार घरमालक व त्याचे कुटुंबीय खोलीच्या भाड्याचे कारण पुढे करून त्यांना घर खाली करण्यासाठी तगादा लावत आहेत. २१ एप्रिल रोजी घरमालकांनी त्यांना, ‘तुझ्यामुळे आम्हाला कोरोना होईल, आताच्या आता खोलीचा किराया भरून घर खाली कर’, असे म्हणून दम दिला. नर्स यांनी काही दिवस थांबण्यास सांगितले. मात्र घरमालकानी त्याच रात्री पुन्हा खोली खाली करण्याचा दम देत नर्सला मारहाण केली. घाबरलेल्या नर्सनी रुग्णालयातील सहकाऱ्यांच्या मदतीने गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत घरमालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे, मात्र पुढे कारवाईबाबत कुठलेही पावले उचलली बसल्याची माहिती परिचरिकेच्या सहकाºयांनी लोकमतशी बोलताना दिली.डॉक्टर्स, नर्सेस आणि मेयो, मेडिकलमध्ये कोरोना बाधित आणि संशयितांवर उपचार करणाºया आरोग्य सेवकांबाबत असेच प्रकार समोर येत आहेत. आज हे आरोग्यसेवक या भीषण परिस्थितीत स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा देत असताना समाज म्हणून असंवेदनशील मानसिकतेतून अस्पृश्यतेची वागणूक त्यांना मिळत आहे. डॉक्टर्स आणि नर्स म्हणून त्यांची सेवा आम्हाला हवी आहे पण आपल्या अवतीभवती मात्र ते नको आहेत. कोरोना योद्धा म्हणून एकीकडे गवगवा करायचा आणि त्यांनाच अस्पृश्य वागणूक द्यायची. या मानसिकतेमुळे मेयो, मेडिकल आणि इतर शासकीय रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स आणि नर्स काम करण्याच्या ठिकाणची ओळख लपवून राहत आहेत. काहींना तर स्वत:चे घर असताना वस्तीच सोडून देण्याच्या धमक्या मिळत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत.