कामगार विमा रुग्णालयातील प्रकार : पॅथालॉजी विभागात आठ पदे रिक्तनागपूर : राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात पॅथॉलॉजिस्ट विभागातील आवश्यक पदे भरण्यात आली नसल्याने एका परिचारिकेला तंत्रज्ञाचे काम करावे लागत आहे. विशेष म्हणजे, गेल्या एक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र कुणीच याकडे लक्ष देत नसल्याने रुग्णालयाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणारे सोमवारीपेठेतील या विमा रुग्णालयात सोर्इंच्या अभावाने अखेरची घरघर लागली आहे. रुग्णालयातील विविध संवर्गातील ५५ टक्के रिक्तपदे आहेत. विशेष म्हणजे, पॅथॉलॉजी विभागाला घेऊन हे रुग्णालय नेहमीच चर्चेत राहिले आहे. या विभागात पॅथॉलॉजिस्ट थांबतच नसल्याने हा विभाग असून नसल्यासारखाच आहे. परिणामी, दरम्यानच्या काळात एका खासगी पॅथॉलॉजी सेंटरमधून रुग्णांच्या चाचण्या केल्या जायच्या. वर्षाला लाखो रुपये यावर खर्च व्हायचे. तीन वर्षांपूर्वी या सेंटरचे बिल थकल्याने चाचण्या करणे बंद केले. नंतर यावर उपाय म्हणून रुग्णालय प्रशासनाने हिंगण्यातील एमडी पॅथॉलॉजिस्टची या रुग्णालयात नेमणूक केली. मात्र काही महिने होत नाही तोच पॅथालॉजिस्ट सोडून गेली. सध्या कंत्राट पद्धतीवर पॅथालॉजिस्टची नेमणूक करण्यात आली आहे. त्याच्या सोबतीला आरोग्य विभागाचा एक तंत्रज्ञ आहे. परंतु रोज १५० वर रुग्णांचे नमुने तपासण्यासाठी येत असल्याने मदत म्हणून एका परिचारिकेला ठेवण्यात आले आहे. तिचे कर्तव्य आणि कार्य हे वेगळे असतानाही तिला या कामात गुंतविण्यात आले आहे. तिला या कामाचा अनुभव नाही. यामुळे काही चूक झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न आहे. सध्याच्या स्थितीत रुग्णालयाच्या प्रयोगशाळा विभागात एक पॅथालॉजिस्ट, चार प्रयोगशाळा तंत्रज्ञ व तीन सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञची पदे रिक्त आहेत. सध्या आठ जणांचा भार तिघांवर आला आहे. याही परिस्थितीत ते काम करीत आहे. प्रशासनाने याची दखल घेत रिक्त पदे भरण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.(प्रतिनिधी)
परिचारिका करते तंत्रज्ञाचे काम
By admin | Published: April 10, 2017 2:34 AM