शिक्षण समितीचा निर्णय : स्थायी समितीपुढे ठेवणार प्रस्तावनागपूर: सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुसूचित जाती-जमाती व दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो़ तसेच यापूर्वी महापालिकेने आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आता महापालिका शाळातील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे नर्सरी, केजी वन आणि टू च्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. २०१६-१७ वर्षाच्या शैक्षणिक सत्रात महापालिकेच्या शाळांत इयत्ता पहिली ते आठवीत २१ हजार ८३५ विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेत आहे़त. केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानाच्या मोफत गणवेश योजनेत केवळ १३ हजार ६९० विद्यार्थी गणवेशासाठी पात्र ठरणार आहे़ उर्वरित ८ हजार १४५ इतर मागासवर्गीय व खुल्या संवगार्तील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ महापालिकेच्या शाळेतील नर्सरी, केजी वन आणि केजी- टू मध्ये शिकणारे १३२० विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे.मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे़ शिक्षण विभागाने तयार केलेल्या प्रस्तावानुसार गणवेशाचे कापड व शिलाईचे दर निश्चित करून कंत्राट दिले जाईल़ संधू क्रिएशन, विन्टेक्स यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, आर. के. ट्रेडर्स, स्टार युनिफॉर्म, पोद्दार सेल्स कापोर्रेशन, काई्टस अॅण्ड सन्स आणि प्रिया गारमेन्ट्स आदी पुरवठादारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
नर्सरीतील विद्यार्थ्यांनाही गणवेश मिळणार
By admin | Published: May 30, 2016 2:14 AM