नागपूर : जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या संपातून कोणताही तोडगा निघत नसल्याचे पाहत सोमवारी परिचारिका, तंत्रज्ञ व कर्मचारी आक्रमक झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अधिष्ठाता कार्यालयासमोर थाळी बजाओ आंदोलन करीत आपला रोष व्यक्त केला.
मेयो, मेडिकल. प्रादेशिक मनोरुग्णलय, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय, शासकीय आयुर्वेद रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय आणि कामगार विमा रुग्णालयातील परिचारिका, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, लिपिक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी १३ मार्चपासून संपावर गेले आहेत. परिचारिकांच्या तुलनेत केवळ नर्सिंग कॉलेजचे केवळ २० टक्के विद्यार्थी व कंत्राटी पद्धतीवर असलेल्या १० टक्के परिचारिकांकडून रुग्णसेवा दिली जात आहे. यांना अनुभव नसल्याने व सलग सात दिवसांपासून काम करीत असल्याने प्रचंड गोंधळ उडाला आहे.
निवासी डॉक्टर आपल्या परीने रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न करीत असलेतरी त्यांना परिचारिकांचीही कामे, शिवाय कार्यालयीन कामेसुद्धा करावी लागत असल्याने तणावात काम करीत आहेत. परिणामी, निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संप लवकर न मिटल्यास रुग्णसेवा अवघड होईल, असा इशारा दिला आहे.