दीनदु:खितांची सेवा हीच ईश्वरसेवा असल्याचे प्रत्येक धर्माने मानले आहे. आपली जशी भावना असते त्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा आपण विचार करीत असताे. कदाचित नाेकरीच्या निमित्ताने रुग्णांच्या सेवेची संधीच आम्हाला मिळाली असेल. यात कधी कधी वाईट अनुभव येतातही. मात्र रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परत जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि हात उंचावून दिलेले आशीर्वाद अधिक माेलाचे असतात. काेराेना काळात अशा असंख्य अनुभवाची शिदाेरी साेबत राहील.
- काजल पाटील, परिचारिका, नरखेड
गरजेच्या वेळी माणुसकी महत्त्वाची : सुजाता मून (स्टाफ नर्स, मेडिकल)
प्रसंग ११ सप्टेंबरचा आहे. मेडिकलमध्ये ‘हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल डिपार्टमेंट’अंतर्गत निरीक्षणाची जबाबदारी सुजाता मून यांच्यावर होती. त्या दिवशी कोविड वाॅर्डात निरीक्षणासाठी फिरत असताना एका संक्रमित गर्भवती महिलेला वाॅर्डात पोहचण्यापूर्वीच प्रसूती कळा सुरू झाल्या. पीपीई किट परिधान करण्याचा वेळही त्यांना मिळाला नाही आणि त्यावेळी त्यांनीही त्याकडे लक्ष दिले नाही. परिचारिका म्हणून महिला व बाळाचा जीव वाचविण्याचे कर्तव्यच त्यांना आठवले. त्यांनी धावूनच महिलेला आधार दिला व जे वैद्यकीय प्रयत्न करायचे ते केले. सातच महिन्यात महिलेची व्हरांड्यातच प्रसूतीही झाली. पण सुजाता यांच्या प्रयत्नाने माता व बाळ दोघेही सुखरूप राहिले. त्यावेळी भीती बाळगून पीपीई किट घालण्यास प्राधान्य दिले असते तर अनर्थ घडला असता. जेव्हा कुणाला गरज असते तेव्हा प्रोटोकाॅल नाही, माणुसकी महत्त्वाची आहे. सुजाता यांनीही रोटेशननुसार कोविड वाॅर्डात सेवा दिली आहे. अशावेळी पती व सहा वर्षाच्या मुलापासून वेगळे राहावे लागले. त्यांच्या मते, सामाजिक जाणीव आवश्यक आहे तरच आपण कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो.