लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ३१ मार्चपर्यंत परिचारिकांची सर्व पदे भरण्यात येईल, असे आश्वासन राज्य परिचारिका संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिल्याने मंगळवारी पुकारण्यात आलेला एक दिवसीय लाक्षणिक संप पुढे ढकलण्यात आला. या निर्णयाने मेयो व मेडिकल प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यातील शासकीय परिचारिकांसह मेयो, मेडिकलच्या परिचारिकांनी १ सप्टेंबरपासून काळ्या रिबीन बांधून आंदोलन केले होते. संघटनेचे उपाध्यक्ष शहजाद बाब खान यांनी ‘लोकमत’ला सांगितले, संपाच्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. डॉ. लहाने यांनी परिचारिकांची पदे भरण्यासाठी १ ऑक्टोबरपर्यंत परीक्षेची तारीख येईल, सात बाय तीन हा क्रम कायम राहील व त्या काळातील सुट्या बॅलेन्स मिळतील, तीन दिवस कोविडची विशेष सुटी मिळेल, अर्जित रजा ३०० वरून ४०० करता येईल, नर्सिंग भत्यासाठी शासनाला पत्र देणार यासह विविध १२ मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली. संपापूर्वीच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मागण्यांबाबत विचार करण्यात येईल, असे लेखी आश्वासनही दिले होते. या सर्र्वांचा विचार करून आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे. परंतु मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन उभे करू, असेही ते म्हणाले.
मेयो, मेडिकलने केली होती तयारीशासकीय रुग्णालयाचा परिचारिका या कणा आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीर हा संप महत्त्वाचा मानला जात होता. संप एक दिवसाचा असला तरी याचा फटका रुग्णांना बसू नये म्हणून मेयो, मेडिकलने पुरेशी तयारी करून ठेवली होती. मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे म्हणाले, सोमवारीच संपाचे नियोजन केले होते. इन्टर्न, नर्सिंग विद्यार्थी यांची मदत घेतली जाणार होती. डॉक्टरांची बैठक घेऊन कामांचे वाटप करण्यात आले होते.