नागपूर : परिचारिकांच्या संपामुळे केवळ इमर्जन्सी शस्त्रक्रिया होत असल्याचे मेयो, मेडिकल प्रशासन म्हणत असले तरी शस्त्रक्रियांना लागणाऱ्या साहित्याची, औषधांची जुळवाजुळव करण्यात चार ते पाच तासांचा वेळ जात असल्याने गंभीर रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. काही शस्त्रक्रिया तर दुसऱ्या दिवशी होत असल्याच्या रुग्णांच्या नातेवाइकांच्या तक्रारी आहेत.
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या मागण्यांसाठी २६ मेपासून काम बंद आंदोलन सुरू केले. परंतु सरकार दुर्लक्ष करीत असल्याचे पाहत शनिवारपासून बेमुदत संपाची हाक दिली. यामुळे मेयो, मेडिकलची रुग्णसेवा कोलमडलीे. दोन्ही रुग्णालयांत नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. केवळ इमर्जन्सी शस्त्रक्रिया होत असल्याचे सांगितले जात असले तरी रोज पाचवर या शस्त्रक्रिया होत नसल्याचे वास्तव आहे.
-इमर्जन्सी शस्त्रक्रिया प्रभावित
मेडिकलमध्ये विदर्भच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून गंभीर रुग्ण येतात. इतर दिवशी विविध विभागांत रोज १५ वर इमर्जन्सी शस्त्रक्रिया होत असताना सध्या पाचही होत नसल्याचे वास्तव आहे. एका डॉक्टरने सांगितले, इमर्जन्सी रुग्णांवर ‘गोल्डन अवर’मध्ये शस्त्रक्रिया होणे गरजेचे असते. परंतु परिचारिकाच नसल्याने निवासी डॉक्टरांनाच शस्त्रक्रियांना लागणाऱ्या सामानाची, औषधांची जुळवाजुळव करावी लागते. यामुळे जेथे पूर्वी तासाभरात शस्त्रक्रिया होत होती तेथे चार ते पाच तासांनंतर शस्त्रक्रिया होत आहेत.
-कॅज्युअल्टीमध्ये औषधांचा ठणठणाट
मेडिकलच्या कॅज्युअल्टीमध्ये औषधी, जीवनरक्षक इंजेक्शन, सलाईन व आवश्यक साहित्याचा साठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी परिचारिकांची असते. परंतु त्याच संपावर असल्याने औषधांसह इतरही साहित्यांचा ठणठणाट आहे. येथील डॉक्टर नाइलाजाने रुग्णांच्या नातेवाइकांना बोहरून साहित्य विकत घेऊन येण्यास सांगत आहेत. यामुळे वाद निर्माण होत आहेत.
-डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी परिचारिकांच्या संपामुळे रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून उशिरा का होईना शनिवारी पत्र काढून प्राध्यापक व अध्यापकांच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द करण्याचे निर्देश दिले. परंतु सुट्ट्यांवर गेलेले वरिष्ठ डॉक्टर शनिवारी परतलेच नाहीत, कर्तव्यावर असलेले डॉक्टरही दुपारनंतर गायब झाले.