नागपूर : शासकीय रुग्णालयाचा कणा असलेल्या परिचारिकाच संपावर गेल्याने मेयो, मेडिकलसह सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. परिचारिकांच्या आंदोलनाचा गुरुवारी चौथा दिवस होता. मागण्यांवर शासनासोबतच चर्चा सुरू असलीतरी तोडगा न निघाल्याने शुक्रवारपासून बेमुदत संपाची हाक महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिली आहे.
पदभरती, पदोन्नती, कोविडभत्ता, रजा आणि इतर अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमधील परिचारिकांनी २१ जूनपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. नागपूर संघटनेचे उपाध्यक्ष शहजाद बाबा खान यांनी सांगितले, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील जवळपास ८०, मेयोमधील १५० तर मेडिकलमधील ८०० परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आंदोलनाचा सुरुवातीच्या दोन दिवसात दोन तास कामबंद आंदोलन ठेवले होते. त्यानंतर बुधवार व गुरुवारी संपूर्ण दिवस कामबंद ठेवण्यात आले. परंतु त्यानंतरही शासन मागण्यांच्याप्रति उदासीन असल्याने नाईलाजाने शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन हाती घ्यावे लागत आहे. परिचारिका संपावर गेल्याने रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत आहेत. याला शासन जबाबदार असल्याचेही खान यांचे म्हणणे आहे.
-२० वॉर्डात परिचारिकाच नाही
मेडिकलमध्ये जवळपास ३७ वॉर्ड व २५ डिपार्टमेंट आहेत. ७८३ नॉन कोविड तर ३०वर कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. त्या तुलनेत केवळ १२ कंत्राटी तर ८ कायम स्वरुपी परिचारिका आहेत. यातील अनेकांची डबल ड्युटी लावण्यात आली आहे. तरीही २० वॉर्ड व २२ डिपार्टमेंट हे विना परिचारिकांचे आहेत. यामुळे रुग्णसेवा अडचणीत आली आहे.
-नर्सिंगचे विद्यार्थीही मिळाले नाहीत
परिचारिकांचा संपाचे नियोजन करताना सर्वात प्रथम आरोग्य विभागातील परिचारिका व नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जाते. परंतु मेडिकल प्रशासनाने या संपाला गंभीरतेने घेतले नसल्याचे दिसून येते. संपाचा दुसऱ्या दिवशीही नर्सिंगच्या विद्यार्थी न मिळाल्याने मेडिकल अडचणीत आले आहे.