लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांकडून प्राध्यापकांना त्रास देण्यात येत आहे. याविरोधात तक्रार करणाऱ्या प्राध्यापकांना एका महाविद्यालयाने कामावरून काढले आहे. कोरोना काळात जाणूनबुजून महाविद्यालयांनी प्राध्यापकांचे वेतन कापून त्यांना मनस्ताप दिल्याचा आरोप नुटातर्फे करण्यात आला. महाविद्यालयांच्या अनियमिततेविरोधात मंगळवारी नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलनदेखील करण्यात आले.
सध्या विद्यापीठाशी संलग्नित विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यापीठाद्वारे गठित व्यवस्थापन परिषद सदस्यांमधून गठित करण्यात आलेली समिती भेटी देत असून तेथील अनियमित कारभाराबद्दल विद्यापीठाला अहवाल सादर करीत आहे. सदर समितीच्या भेटींचा संबंधित महाविद्यालयाच्या शिक्षकांना लाभ होण्यापूर्वीच काही अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाकडे तक्रार का केली याचा मुद्दा बनवत त्रास देण्यास सुरुवात केली आहे, असा दावा नुटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. नुटाचे उपाध्यक्ष आणि नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन कोंगरे यांच्या नेतृत्वात जमनालाल बजाज प्रशासकीय परिसरात मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात त्रास सहन करणारे ५० हून अधिक प्राध्यापक सहभागी झाले होते. कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांच्यासमोरदेखील त्यांनी बाजू मांडली. आंदोलनात नुटाचे सहसचिव डॉ. अजित जाचक, नागपूर शहर शाखेचे अध्यक्ष डॉ. विवेक चव्हाण, सचिव डॉ. दमयंती घागरगुंडे, डॉ. रमेश इंगोले, सदस्य डॉ. हेमंत बागडे ,डॉ. आनंद भाईक, डॉ. बाबूलाल धोत्रे, डॉ. खुशाल मेले उपस्थित होते.