नागपूर : शाळा बंद असल्या तरी शासनाने शालेय पोषण आहारांतर्गत विद्यार्थ्यांना धान्याचे वाटप सुरूच ठेवले आहे. दोन महिन्यांपूर्वी धान्याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराचे कंत्राट संपल्याने आणि शासनस्तरावरून नवीन पुरवठादार निश्चित होऊ न शकल्याने पोषण आहाराचे धान्य दोन महिन्यांपासून शाळेत पोहोचलेच नाही.
त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील तीन लाख विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पोषण आहाराचे हे धान्य ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे आहे. पुरवठाधारक कन्झ्युमर्स फेडरेशनचे पुरवठ्याचे कंत्राट जुलैच्या २० तारखेला संपले. शासन पातळीवरून नव्या पुरवठाधारकांसाठी निविदा आमंत्रित न केल्याने या आहार वाटपाला ‘ब्रेक’ लागल्याची माहिती आहे. पहिली ते आठवीच्या जवळपास तीन लाख विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार देण्याची योजना आहे. शाळेतून मध्यान्ह भोजन योजनेच्या नावाखाली शिजवलेला आहार देण्यात येतो. मात्र, कोरोनाकाळात शिजवलेल्या आहाराऐवजी कडधान्य स्वरूपात आहार देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. एप्रिल, मार्च महिन्यातील पोषण आहाराची रक्कम डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे नियोजन केले होते. दुसरीकडे पुरवठादाराचे कंत्राट संपल्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या धान्याचा पुरवठा अद्यापही विद्यार्थ्यांना होऊ शकला नाही. याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. मात्र, शासन पातळीवरील तिढा असल्याने यावर शिक्षण विभाग काहीही बोलायला तयार नाही.
- जिल्ह्याचा पोषण आहाराचा कोटा
तांदूळ - ७ लाख २० हजार किलो
मुगडाळ - १ लाख २४ हजार किलो
चणाडाळ - १ लाख ९२ हजार किलो
- पोषण आहाराच्या पुरवठ्याबाबत शासनस्तरावर नियोजन करण्यात येते. आम्ही शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे.
- चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद