नागपूर : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहार वितरित करण्यात येतो. या पोषण आहाराची जबाबदारी शाळेतील एखाद्या शिक्षकावर सोपविली जाते. पोषण आहाराच्या वितरणात थोडी जरी गडबड झाली की, त्याची भरपाई शिक्षकांना करावी लागते. त्यामुळे बहुतांश शिक्षक ही जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसतात. पण आता शालेय पोषण आहार विभागाने शिक्षकांची ही डोकेदुखीच संपविली आहे. महापालिकेच्या हद्दीतील ५७० शाळांमध्ये पोषण आहार शिजविण्याची जबाबदारी ४३ बचत गटांना दिली आहे.
यात महापालिकेच्या १०० टक्के शाळा असून, उर्वरित शाळा खासगी अनुदानित आहेत. आता बचत गटांच्या माध्यमातून ९० हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जाणार आहे. बचत गटांना शिक्षण विभागातर्फे तांदूळ पुरविला जाईल व उर्वरित साहित्य हे बचत गटांना खरेदी करून पोषण आहार तयार करायचा आहे. जुलै २०२२ पासून ही प्रक्रिया रखडली होती. पोषण आहार विभागातर्फे याची निविदा काढून बचत गटांना वितरणाची जबाबदारी दिली आहे.
- १४२ शाळांमध्ये स्वत:चे किचन
महापालिकेच्या हद्दीतील मनपाच्या व खासगी अनुदानित शाळांपैकी बहुतांश शाळांना बचत गटांतर्फे पोषण आहार पुरविला जाईल. परंतु, अजूनही १४२ शाळांनी पोषण आहाराची जबाबदारी स्वत:कडेच ठेवली आहे. या शाळांचे स्वत:चे किचन असून, पोषण आहार तयार करण्यासाठी त्यांनी स्वत:ची यंत्रणा तयार केली आहे.