लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील २३२४ अंगणवाड्यांमध्ये आता यापुढे महिला बचत गटांच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय महिला बाल कल्याण समितीने घेतला आहे. यासंदर्भात गत दोन महिन्यांपूर्वीच निविदा जारी करण्यात आली आहे.सध्या राज्यातील अंगणवाड्यांमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघाच्यामार्फत पोषण आहाराचा पुरवठा होत आहे. राज्याचे स्थानिक पातळीवर पोषण आहार वितरण व्यवस्थेबाबत नियम आहेत. स्थानिक पातळीवर आजवर जि.प.ने ही व्यवस्था करण्यात रस दाखविला नसल्याने मे २०१९ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने राज्य स्तरावर पुरवठ्याची व्यवस्था केली. परंतु पुरवठा होणारा आहार रॅण्डम पध्दतीने एनएबीएल सरकारी प्रयोगशाळांमध्ये तपासणीकरिता पाठविला जातो. मे-जून महिन्यामध्ये याची तपासणी होते. त्याचा अहवाल आल्यानंतरच वितरण होते. सद्यस्थितीत सुरू असलेली पुरवठा व्यवस्था ही तत्कालीन राज्य सरकारच्या कार्यकाळातील आहे. त्यामुळे याचा जि.प.शी कुठलाही संबंध नाही. आता या व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघाकडील पुरवठा बंद करुन स्थानिक पातळीवर महिला बचत गटांच्या माध्यमातून अंगणवाड्यांना हा पुरवठा करण्यात येईल. यासंदर्भातील निर्णय महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीतही घेण्यात आला आहे. त्याची निविदाही काढण्यात आली असून, लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोढारे यांनी सांगितले.
अंगणवाड्यांमध्ये महिला बचत गटांकडून मिळणार पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 9:11 PM
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील २३२४ अंगणवाड्यांमध्ये आता यापुढे महिला बचत गटांच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय महिला बाल कल्याण समितीने घेतला आहे.
ठळक मुद्देराज्य सरकारच्या यंत्रणेला नाकारले : महिला व बाल कल्याण समितीचा निर्णय