Rahul Gandhi in Nagpur, OBC - नागपूर: कविवर्य सुरेश भट सभागृहात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या संविधान सन्मान संमेलनात विदर्भातील ओबीसी समाजातील प्रमुख संघटनांना मानाचे स्थान न दिल्यामुळे संघटनांच्या वतीने असंतोष व्यक्त करण्यात आला. ओबीसी समाजातील विविध संघटनांनी या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले असून, त्यांना व्यासपीठावरही जागा न मिळाल्याने रोष व्यक्त करण्यात आला. काँग्रेसने हा कार्यक्रम संविधानाच्या सन्मानासाठी नसून तर निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन केला, असा आरोप भाजपाकडून केला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संमेलनाची धुरा सांभाळली असली तरी इतर संघटनांच्या नेत्यांना डावलण्यात आले, ज्यामुळे अनेक संघटनांचे कार्यकर्ते दुखावले गेले. काही संघटनांनी निमंत्रण मिळाल्यानंतरही संमेलनावर बहिष्कार टाकला, तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनीही संमेलनात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता.
या संमेलनासाठी गर्दी जमविण्याचे कार्यकर्त्यांना विशेष लक्ष्य दिले गेले होते . अशी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांची कुजबुज अशी होती. काँग्रेस कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्ते व्यासपीठावरून ‘लाल पुस्तिका’ दाखवत होते, परंतु प्रतिसाद फारच कमी मिळाला. त्यामुळे राहुल गांधी यांनीही आयोजकांची कानउघडणी केल्याची चर्चा आहे.
महिला हक्कांसाठी दिलेल्या घोषणा आणि प्रत्यक्षात महिलांना बोलण्याची संधी न मिळाल्यानेही नाराजी पसरली. काही महिला कार्यकर्त्यांना व्यासपीठावर बोलावून पुन्हा खाली बसवण्यात आले. यावर महिलांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. “महिलांवर अन्याय करून, घोषणा देण्याचा हा कुठला न्याय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला गेला.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट), यांनाही या कार्यक्रमाची चाहूल लागल्यामुळे ते अलिप्त राहिले, अशी चर्चा आहे.
कालचा सुरेश भट सभागृहातील राहुल गांधी यांचा कार्यक्रम हा ओबीसी समाजाच्या हितासाठी नव्हता तर लाल पुस्तकाच्या प्रचार आणि प्रसारासाठी होता.- सुधाकर कोहळे, भाजपचे नागपूर जिल्हाध्यक्ष