शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ओबीसींचा राजकीय फुटबॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 4:06 AM

एखाद्या समाजघटकांच्या जिव्हाळ्याच्या, जगण्या-मरण्याच्या प्रश्नाचा कसा राजकीय फुटबॉल होतो, हे समजून घ्यायचे असेल तर सध्या इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसींच्या ...

एखाद्या समाजघटकांच्या जिव्हाळ्याच्या, जगण्या-मरण्याच्या प्रश्नाचा कसा राजकीय फुटबॉल होतो, हे समजून घ्यायचे असेल तर सध्या इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळाकडे पाहायला हवे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण रद्द झालेले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची तरतूद करणारे कलम रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. ते आरक्षण अडचणीत आले आहे, हे मात्र खरे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती व जमातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षणाला ५० टक्क्यांची मर्यादा नाही. २०१० मधील के. कृष्णमूर्ती खटल्याच्या आधारे न्यायालयाचे म्हणणे असे की, हे जाती व जमातीला दिलेले आरक्षण घटनात्मक, तर ओबीसींचे आरक्षण वैधानिक म्हणजे राज्य सरकारांनी निर्धारित केलेले आहे. जिथे अनुसूचित जाती व जमाती मिळून आरक्षण ५० टक्क्यांच्या आत असेल तिथे ५० टक्क्यांपर्यंत उरलेले आरक्षण ओबीसींना देता येईल. एखादा जिल्हा किंवा तालुका पूर्णपणे आदिवासी अथवा अनुसूचित जातीबहुल असेल तर तिथे जितकी लोकसंख्या तितके म्हणजे ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण दिले जाऊ शकते. तथापि, जिथे असे नाही तिथे या तिन्ही घटकांच्या एकूण आरक्षणाला मात्र कोणत्याही परिस्थितीत ५० टक्क्यांचा उंबरठा ओलांडता येणार नाही. दुसरी बाब, ओबीसींना १९९४ पासून मिळणाऱ्या आरक्षणाला आकडेवारीचा आधार हवा. न्यायालयाच्या भाषेत स्वतंत्र मागासवर्ग आयोग नेमून इम्पिरिकल डाटा म्हणजे नमुना सर्वेक्षणाच्या स्वरूपातील ती आकडेवारी सादर करा व खुश्शाल आरक्षणाचा हक्क मिळवा. पण, ओबीसींचे आरक्षण रद्दच झाले अशी आवई उठवून महाराष्ट्रातील झाडून सगळ्या पक्षांना अचानक ओबीसींच्या राजकीय भवितव्याचा पुळका दाटून आला आहे. काहींची आंदोलने, काहींचे चिंतन मेळावे सुरू आहेत. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून भाजपने राज्यभर चक्का जाम केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, ‘सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारलाच आरक्षणासाठी दोषी धरताना, तुम्हाला जमत नसेल तर आरक्षण परत मिळवून देण्याच्या मोहिमेची सूत्रे आमच्याकडे द्या. चार महिन्यांत आरक्षण मिळवून दिले नाही तर राजकीय संन्यास घेईन’, अशी राणा भीमदेवी थाटाची घोषणा करून टाकली. म्हणजे कोण सत्तेवर आहे यावर आरक्षण ठरणार आहे जणू. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांमधील नेत्यांनी ही सगळी चूक आधीच्याच, म्हणजे फडणवीस सरकारची चूक असल्याच्या मुद्द्यावर लोणावळ्यात राजकीय चिंतन केले. या सगळ्याचा अर्थ जी चिंता व्यक्त होतेय, चिंतन सुरू आहे, ते अगदीच निरर्थक नाही. सत्ताधारी आघाडी व विरोधी भाजप या दोन्हींचे दावे-प्रतिदावे खरे आहेत; पण अर्धेच. भाजप-सेना युती सरकारच्याच काळात नागपूर, अकोला, वाशिम वगैरे जिल्हा परिषदांची निवडणूक जाहीर झाल्या. तेव्हा, ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. आकडेवारीचा मुद्दा समोर आला. तेव्हा मागासवर्ग आयोग स्थापन करून आम्ही तातडीने इम्पिरिकल डाटा सादर करतो, या अटीवर निवडणूक घेण्यास परवानगी मागच्या सरकारनेच मागितली. तशी ती न्यायालयाने दिली. ती आकडेवारी मात्र सादर करण्यात आली नाही. तेव्हा संतापून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये ओबीसी गट व गणांमधून निवडून आलेल्यांचे सदस्यत्व रद्द केले व त्या जागा पोटनिवडणुकीत खुल्या, सर्वसाधारण वर्गातूनच भरायला सांगितले. खरे तर सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही सगळी वस्तुस्थिती ओबीसी समाजाला समजून सांगायला हवी. दुसरीकडे स्वतंत्र मागासवर्ग आयोग नेमून आकडेवारी जमा करून ती सर्वोच्च न्यायालयाला सादर करायला हवी किंवा मध्यंतरी जी जातीगणना झाली ती आकडेवारी मिळवायला हवी. आरक्षण देण्यामागील राज्याचा हेतू प्रामाणिक असल्याचे व त्याला तालुका, जिल्हा स्तरावरील आकडेवारीचा आधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरक्षण बहाल केले जाईल. ओबीसी महासंघाच्या काही जाणकारांचेही असेच म्हणणे आहे. सोबतच घटनादुरुस्ती करून केंद्र सरकारने ओबीसींना घटनात्मक आरक्षण द्यावे, अशीही मागणी आहे. त्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याऐवजी मराठा समाजापाठोपाठ ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आघाडीला घेरण्याची संधी विरोधकांनी साधणे आणि आधीचे सरकार बहुजनविरोधी होते, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी करणे यातून राजकीय गदारोळ नक्कीच निर्माण होईल. ओबीसींचे राजकीय भले मात्र सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या मार्गानेच होऊ शकेल.

--------------------------------------------