नागपूर : ओबीसी समाज समिती महाराष्ट्राच्या प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यांनी आरक्षण विरोधकांच्या निषेधार्थ शनिवारी संविधान चौकात मुंडन आंदोलन केले. समितीचे अध्यक्ष नानाभाऊ उमाठे यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी ओबीसीचे आरक्षण पुन्हा लागू करावे, अशी मागणी केली.
आंदोलनादरम्यान ओबीसी समाज समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ उमाठे म्हणाले आरक्षण विरोधकांच्या राजकारणामुळे आरक्षण संपविण्यात आले आहे. याचा परिणाम भविष्यात ओबीसी समाजातील लोकांच्या नोकरी, शिक्षण व सवलतीवर होणार आहे. ओंकारेश्वर गुरव यांच्याजवळ पैसा नव्हता, कुठलेही साधन नव्हते. अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आमदारांनी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला. तर विधानसभेचे कामकाज स्थगित न करता आमदारांचे निलंबन केले. ओबीसी समाज त्याचा विरोध करतो. संविधान चौकात ओबीसी समाज समितीचे नानाभाऊ उमाठे, ओंकारेश्वर गुरव, मुरली भोले, संजय देशमुख, विजय खंडे, राजेंद्र देशमुख यांनी मुंडन केले. आंदोलनात भाजपा शहरमंत्री रामभाऊ आंबुलकर, सभापती सुनील हिरणवार, नितिन गुडधे पाटील, प्रकाश तितरे, बालाजी रेवतकर, अनमोल भोले, राकेश अंतुरकर आदी उपस्थित होते.