नागपूर : अद्भूत, अद्वितीय, अकल्पनीय अन् नि:शब्द करणारे चित्र मंगळवारी दीक्षाभूमीवर बघायला मिळाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत बुद्धाचे धम्मचक्र गतीमान करून ६७ वर्षाचा काळ लाेटला पण त्या प्रवर्तनाचा उत्साह तसुभरही कमी झालेला दिसत नाही. कुणाचे निमंत्रण नाही की कशाचे आमिष नाही, केवळ त्या महामानवाबद्दल असलेला प्रचंड आदर व अभिमान बाळगत त्यांना नतमस्तक हाेण्यासाठी लाखाेंचा जनसागर ‘जय भीम’ चा जयघाेष करीत दीक्षाभूमीवर येताे. यावर्षीही लाखाे भीम अनुयायी तथागत बुद्ध व महामानवाला वंदन करण्यासाठी जगाच्या कानाकाेपऱ्यातून दीक्षाभूमीवर पाेहचली हाेती.
गेली दाेन दिवस दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर निळ्या महासागराने फुललेला हाेता. रेल्वे, बस, कार, टेम्पाे व मिळेल त्या साधनाने ही माणसे नागपूरला पाेहचली. दीक्षाभूमीकडे जाणाऱ्या बहुतांश रस्त्यांवर गर्दीचा महापूर वाहत होता. उपराजधानीचे रस्ते या अनुयायांनी पायी चालतच माेजून काढले. मंगळवारी सकाळपासून मुख्य स्तुपात अभिवादन करण्यासाठी लाेकांची रांग लागली हाेती. रात्री मात्र या परिसरात गर्दी प्रचंड वाढली हाेती. ५ लाखांच्या वर जनसमुदायाने संपूर्ण दीक्षाभूमी व आसपासचे रस्ते भरून गेले. हातात पंचशील ध्वज, शुभ्र वस्त्र परिधान केलेले अनुयायी मुखात ‘जय भीम, जय बुद्ध’चा जयघाेष करीत दीक्षाभूमीवर पाेहचल्यावर ‘बुद्धम शरणम गच्छामी’च्या मंद स्वरात अभिवादन करीत हाेते.
३०० च्यावर पुस्तकांच्या स्टाॅलवर गर्दी.
दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांमध्ये सर्वाधिक चर्चा असते ती पुस्तकांची. येथे भाकरीची शिदाेरी आणणारे भीम अनुयायी परत जाताना ज्ञानरुपी पुस्तकांची शिदाेरी घेऊन घरी जातात, कारण त्यातच त्यांना महामानवाने दिलेला उन्नतीचा मार्ग सापडताे. यावेळीही पुस्तकांच्या स्टाॅलवर प्रचंड गर्दी दिसून आली. या परिसरात पुस्तकांचे ३०० च्यावर स्टाॅल लागले हाेते. शासकीय मुद्रणालय व बार्टीच्या स्टाॅलवर पुस्तके खरेदीसाठी लाेकांच्या रांगा लागल्या हाेत्या. माेबाईलच्या युगात पुस्तकांवर काेट्यवधीची उलाढाल हाेणारे कदाचित देशातील हे एकमेव स्थळ असेल.
सेवेसाठी सरसावले हजाराे हात
देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना कुठलीही गैरसोय सहन करावी लागू नये यासाठी दरवर्षी र्शेकडाे संस्था, संघटनांचा सेवाभाव यावर्षीही तेवढ्याच प्रमाणिक पणे सुरू होता. दीक्षाभूमीच्या परिसरात आणि शहरात जागोजागी या संस्थांनी भोजनदान करून सेवाभाव जपला. दीक्षाभूमी परिसरातच ५० च्या जवळपास संस्थांच्या स्टॉलमध्ये भोजनदान व इतर खाद्यपदार्थांची साहित्य वितरीत करण्यात आली. तेवढ्याच संख्येने आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी आदींची सेवा देण्यात आली. काहींकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके व बौद्ध साहित्याचे नि:शुल्क वितरण करण्यात आले. दीक्षाभूमीवर मोठ्या संख्येने येणाऱ्या विद्यार्थी व तरूणांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक संस्था, संघटना सरसावल्या होत्या. यामध्ये शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचे बौद्ध विद्यार्थ्यांसोबतच देश-विदेशात नोकरी करणारे, उद्योग करणारे, शिक्षण घेणारे विद्यार्थी सेवा देण्यासाठी दीक्षाभूमीवर दाखल झाले होते. उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षांसह विविध अभ्यासक्रम आणि व्यवसायविषयक मार्गदर्शन तरूणांना येथे मिळाले. त्यामुळे हा सोहळा धार्मिक स्थळाऐवजी ज्ञान प्रसाराचे केंद्र ठरले आहे.