ब्रह्मपुरीतील वाघाला बेशुद्ध करून पकडण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 09:24 PM2018-07-02T21:24:45+5:302018-07-02T21:26:15+5:30
ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील सी-१ वाघाला बेशुद्ध करून पकडण्याच्या आदेशाविरुद्ध वन्यजीवप्रेमी डॉ. जेरील बनाईत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. संबंधित आदेश जारी करताना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात आले नाही असा त्यांचा आरोप आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील सी-१ वाघाला बेशुद्ध करून पकडण्याच्या आदेशाविरुद्ध वन्यजीवप्रेमी डॉ. जेरील बनाईत यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. संबंधित आदेश जारी करताना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यात आले नाही असा त्यांचा आरोप आहे.
ब्रह्मपुरी वनक्षेत्रात एका वाघाने गेल्या सहा महिन्यांत कमलाबाई निकोडे, गीताबाई पेंदाम, मुकुंदा भेंडाळे, महादेव गेडाम व वनिता चौके यांना ठार मारले. या घटना सिंदेवाही, किन्ही, मुरमाही व लाडबोरी परिसरात घडल्या. हे हल्ले सी-१ वाघानेच केले असे वन विभागाचे म्हणणे आहे. गावकऱ्यांच्या तक्रारींमुळे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी गेल्या २५ जून रोजी संबंधित आदेश जारी केला. तो आदेश जारी करण्यापूर्वी नरभक्षक वाघाची योग्य ओळख पटविण्यात आली नाही. आतापर्यंत झालेल्या घटनांचा पंचनामा, डीएनए चाचणी, शवविच्छेदन अहवाल इत्यादी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही असे अर्जदार बनाईत यांचे म्हणणे आहे.
मुख्य वनसंरक्षकांना नोटीस
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व झेड. ए. हक यांनी सोमवारी अर्जावर सुनावणी केल्यानंतर मुख्य वनसंरक्षकांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला. अर्जदारातर्फे अॅड. तुषार मंडलेकर तर, वन विभागातर्फे अॅड. कार्तिक शकुल यांनी बाजू मांडली.