लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यूट्युब चॅनलच्या कथित पत्रकाराद्वारे जलप्रदाय विभागाच्या महिला अधिकारी यांच्याशी हप्तावसुली करण्यासाठी शिवीगाळ आणि अश्लील वर्तणूक करण्याचे प्रकरण समाेर आले आहे. सदर पाेलिसांनी महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून जाफरनगर निवासी मुन्ना पटेलवर गुन्हा दाखल केला आहे.
मुन्ना पटेल स्वत:ला यूट्युबचा पत्रकार असल्याचे सांगताे आणि सिव्हिल लाइन्स भागातील शासकीय कार्यालयांमध्ये फिरत असताे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला अधिकारी मंगळवारी दुपारी ३.४५ वाजताच्या दरम्यान त्यांच्या कार्यालयातील कक्षात असताना पटेल तेथे पाेहोचला. त्याने ‘मार्च महिना संपत आला असूनही तुम्ही पैसे दिले नाही,’ असे बाेलत आपत्तीजनक भाषेत बाेलू लागला. कक्षात एकटी असल्याने, साहेबांशी बाेलताे, असे सांगत त्या शेजारच्या कक्षात गेल्या. मात्र, पटेलही त्यांच्या मागे गेला व ‘मी पत्रकार आहे, तुम्हाला माझ्याशी बाेलावे लागेल,’ असे म्हणत धमकी द्यायला लागला. महिला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी माेबाइलवर बाेलायला लागल्याने, आराेपी पटेलने त्यांना शिवीगाळ करीत अश्लील भाषेत बाेलायला लागला. त्यामुळे संबंधित महिला अधिकारी घाबरल्या.
दरम्यान, हा प्रकार सुरू असताना कार्यालयातील कर्मचारी तेथे पाेहोचले. त्यांनी आराेपी पटेलला तेथून जायला सांगितले. मात्र, ताे कर्मचाऱ्यांशीही अरेरावी करायला लागला. त्यानंतर, एका अभियंत्याने हिंमत करून त्याला कक्षाबाहेर काढले. महिला अधिकारी यांनी बुधवारी सदर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पाेलिसांनी आराेपी पटेलविरुद्ध अवैध वसुली, गैरवर्तन, धमकी, मारहाण, कार्यालयात गाेंधळ घालून कामात अडथळा आणण्यासह काेविड कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पटेलने यापूर्वीही संबंधित महिला अधिकाऱ्यांशी, तसेच इतर विभागातील कार्यालयात पैशांसाठी गाेंधळ केल्याचे सांगण्यात येत आहे.