लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्याबाहेर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन खरीपाच्या महत्त्वाच्या हंगामात पासची डोकेदुखी वाढली आहे. नागपूरलगतच्या वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची सीमाबंदी नाक्यावर अडवणूक होत आहे. नागपूर जिलहधिकाऱ्यांनी यासंदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन शेतकऱ्यांना पासची मागणी करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. मात्र लगतच्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे शेतकऱ्यांपुढे प्रवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पेरणीसारख्या महत्त्वाच्या हंगामामध्ये शेतावर रोजच जाणे आवश्यक असते. त्यामुळे दैनिक पासऐवजी मासिक पास देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे या तालुक्यातील नंदपूर या गावामध्ये शेती असणाऱ्या शेतकऱ्याने ही व्यथा ‘लोकमत’कडे व्यक्त केली. हा शेतकरी नागपुरात वास्तव्यास असून शेती वर्धा जिल्ह्यात आहे. पेरणीसारख्या महत्त्वाच्या हंगामात शेतावर रोज जाणे आवश्यक असते. मात्र वर्धा जिल्ह्यातील नाक्यावरील पोलीस आणि अधिकारी पास आणि वैद्यकीय प्रमाणपत्र मागतात. यामुळे रोज पास काढण्यासाठी वेळ खर्च करणे तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी येणारा खर्चही रोज उचलणे कसे शक्य आहे, असा या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. अनेक शेतकरी वर्ध्यासह भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात नागपुरातून शेती करतात. इतर वेळी सालगडी यांच्या भरवशावर काम करता येईल, मात्र पेरणीसारखा हंगाम डोळ्याआड कसा करायचा, हा अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.नागपूरलगत असलेल्या वर्ध्यासह भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही असाच प्रश्न आहे. भिवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांपुढेही सर्वाधिक समस्या आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हाअंतर्गत मार्गाचा अवलंब करणे सुरू केला आहे. मात्र महामार्गावरून प्रवास करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण कायमच आहे. तालुकास्थळावरून कुठे ५ तर कुठे १५ किलोमीटर अंतरावर दुसऱ्या जिल्ह्याच्या सीमा सुरू होतात. त्याच्याही पलीकडे दूर अंतरावर शेती असल्याने हा अडचणीचा मुद्दा उपस्थित झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी, नीलज, आमगाव, निष्टी, भुयार, तर चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, चिमूर, कोलारी, साठगाव, शंकरपूर, जवराबोडी, भिसी हा परिसर तर वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, धामणगाव हा परिसर भिवापूर तालुक्याला अगदी खेटून आहे. हिंगणा तालुक्यातील शेतकऱ्यांची शेती सेलू, सिंदी रेल्वे या तालुक्यांमध्ये आहे. बुटीबोरीहून अनेक शेतकरी समुद्रपूर तालुक्यात शेती करतात.सातबारा दाखवूनही समाधान नाहीनाक्यावरील अधिकाऱ्यांना शेतीचा सातबारा दाखवूनही समाधान होत नाही. पासची मागणी केली जाते. नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने या शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच आता बदलला आहे. परिणामत: पोलिसांकडून आणि नाक्यावरील अधिकाऱ्यांकडून अपमानित होण्यात घडत असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे. त्यामुळे कामे बुडवून दररोज परवानगी कशी आणायची, असा या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.आम्हा शेतकऱ्यांसाठी पेरणीचा हंगाम महत्त्वाचा असतो. हा वेळ वाया गेला तर त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. आमची शेती वर्धा जिल्ह्यात आहे. मात्र तेथील नाक्यावरील अधिकाऱ्यांकडून पाससाठी अडवणूक केली जाते. रोज पास काढणे शक्य नाही.- राजू मांडवकर, शेतकरी, बेलतरोडी
शेतकऱ्यांची सीमा तपासणी नाक्यावर अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 9:51 PM
नागपूर जिल्ह्याबाहेर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन खरीपाच्या महत्त्वाच्या हंगामात पासची डोकेदुखी वाढली आहे. नागपूरलगतच्या वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची सीमाबंदी नाक्यावर अडवणूक होत आहे.
ठळक मुद्देऐन हंगामात शेतकऱ्यांपुढे संकट : काम बुडवून रोज कसा काढायचा पास, शेतकरी म्हणतात दैनिकऐवजी मासिक पास द्या