लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बनावट कागदपत्रे तयार करून लाखोंच्या प्लॉटवर कब्जा केल्याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी एका महिलेसह चाैघांविरुद्ध गु्न्हा दाखल केला. विशेष म्हणजे, २३ वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे.
ओमप्रकाश परसरामजी मानकर (वय ४६) हे गोधनीजवळच्या वाघोबानगरात राहतात. त्यांचे सासरे मोरेश्वर शिवरामजी इंगोले यांनी न्यू नागपूर को-ऑप. हाउसिंग सोसायटी निर्माण केली होती. इंगोले यांचे लेआऊट होते. त्यांच्याकडून मानकर यांनी माैजा झिंगाबाई टाकळी येथील खसरा नंबर २४५ मध्ये १५ नंबरचा प्लॉट १ जानेवारी १९९८ ला विकत घेतला होता. त्याची बनावट कागदपत्रे तयार करून मल्हारी शिवम राठोड, कृष्णा मल्हारी राठोड (रा. गिट्टीखदान), सहिदा बानो रहमान खान आणि सय्यद लियाकत सय्यद जाफर (रा. राठोड लेआऊट) यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे मानकर यांच्या मालकीच्या प्लॉटची विक्री आरोपी सहिदाच्या नावे केली. या आणि अन्य प्लॉटची अशीच बनावट कागदपत्रे तयार करून त्या आधारे कब्जा मारला. या संबंधाने वारंवार तक्रारी करूनही यापूर्वी आरोपींवर कारवाई झाली नाही. चाैकशीच्या नावाखाली बरेच गुऱ्हाळ चालल्यानंतर अखेर गिट्टीखदान पोलिसांनी बुधवारी या प्रकरणात उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.