हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत उतरत होते. दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरूप आले होते. विशाल, उचंबळणारा, गर्जणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला होता, तो येथील माती मस्तकाला लावण्यासाठी. नवीन ऊर्जा घेण्यासाठी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक होण्यासाठी. डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकाराने अख्खा परिसर दुमदुमत होता. स्तुपातील बाबासाहेबांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे स्वयंसेवक जागोजागी मदतीसाठी उभे होते. धम्मचक्र प्रवर्तनदिनाचे एक खास आकर्षण म्हणजे त्यानिमित्त इथे भरणारे पुस्तक प्रदर्शन. लाखो पुस्तके, मासिके, विशेषांक विकल्या गेले. केवळ आंबेडकरी जनताच नव्हे तर समाजातील सर्व स्तरांतील, जातीधर्मांच्या लोकांनी पुस्तके खरेदी करण्यासाठी दीक्षाभूमीवर गर्दी केली होती. हजारो मैलावरून लाखोंच्या संख्येने आलेल्या भीमसैनिकांच्या जनसागराला सेवा देण्यासाठी ५०० वर संघटना सरसावल्या होत्या.
सेवेचा महासागर
By admin | Published: October 24, 2015 3:29 AM