लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७० वर्षीय मनोरुग्ण मालती पाठक यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी दीड वर्षानंतर दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये संबंधित महिला वॉर्डात ड्युटीवर तैनात असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मानकापूर पोलिसांनी तपासानंतर मंगळवारी आरोपीविरुद्ध ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यामुळे बुधवारी सकाळी मनोरुग्णालयातील अटेंडंट व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनही केले.मनोरुग्णालयात २० सप्टेंबर २०१६ रोजी मनोरोगी जयंत नेरकर यांचा संशयास्पद मृत्यू झाला. यानंतर ६ आॅक्टोबर २०१६ रोजी मालती पाठक यांचा संशयास्पद मृत्यू झाला. मनोरुग्ण प्रशासनाने तेव्हा मृत्यू संशयास्पद असल्याचे नाकारले होते. परंतु जानेवारी २०१७ मध्ये पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये पाठक यांचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे उघडकीस आले होते. यानंतर ड्युटीवर असलेले डॉक्टर, दोन नर्स आणि दोन अटेंडंट यांना विचारपूस करण्यात आली. १५ डिसेंबर २०१७ रोजी नर्स आणि अटेंडंट यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली. त्याचप्रकारे विभागीय चौकशी समिती सुद्धा गठित करण्यात आली होती. परंतु चौकशी समितीच्या अहवालाचे काय झाले, कुणाविरुद्ध कारवाई झाली, हे स्पष्ट होऊ शकले नाही.दरम्यान मानकापूर पोलिसांकडून तपास सुरू होता. ड्युटीवर तैनात महिला कर्मचाऱ्यांनी निष्काळजी केल्याची बाब समोर आली. त्यामुळे मंगळवारी मनोरुग्णालयातील एक महिला अटेंडंट आणि एक सफाई कामगार यांना आरोपी करण्यात आले असून आरोपींना कोर्टात तारखेवर उपस्थित राहावे लागेल.चतुर्थ श्रेणी कर्मचारीच दोषी कसे?दरम्यान संतप्त कर्मचाऱ्यांनी तासभर काम बंद आंदोलन केले. त्यांचे म्हणणे होते की, मनोरुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू झाल्यास चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाच दोषी धरले जाते. प्रत्येक वॉर्डातील रुग्णांची देखरेख व उपचाराची जबाबदारी ही डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांची असते. परंतु डॉक्टर आणि नर्स यांना जबाबदार धरले जात नाही प्रत्येकवेळी चतुर्थ श्रेणी कर्मचारीच दोषी कसे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी पूर्ण सहकार्य व मदतीचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
मनोरुग्णालयातील दोन अटेंडंटविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:20 PM
प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७० वर्षीय मनोरुग्ण मालती पाठक यांचा गळा दाबल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणात पोलिसांनी दीड वर्षानंतर दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये संबंधित महिला वॉर्डात ड्युटीवर तैनात असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मानकापूर पोलिसांनी तपासानंतर मंगळवारी आरोपीविरुद्ध ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देमालती पाठक हत्याकांड : दीड वर्षांपूर्वी गळा दाबल्याने झाला होता मृत्यू