कोविड आढावा बैठकीत पालकमंत्र्यांच्या सूचना
बैठकीतील इतर महत्त्वाचे निर्देश
लसीकरणाचा वेग आणखी वाढवा
तिसऱ्या लाटेपूर्वी आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाची समस्या सोडवा
सोशल माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करा
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संसर्ग काळात प्रशासनाच्या आवाहनानंतर खासगी हॉस्पिटलने केलेले सहकार्य अनमोल आहे; मात्र याच काळात काही असामाजिक तत्वांनी संधीचा फायदा तर घेतला नाही ना, याची तपासणी करा. खासगी हॉस्पिटलमधील तक्रार, आक्षेप असणाऱ्या बिलांचे परीक्षण करण्यासाठी तटस्थ पद्धतीने काम करणाऱ्या वैद्यकीय समितीचे गठन करा, सत्य जनतेपुढे येऊ द्या, असे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये नागपूर जिल्ह्यातील कोविडसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागुल, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, आरोग्य विभागाचे उप-संचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एस. सेलोकार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष अनूप मरार उपस्थित होते.
हॉस्पिटल्समध्ये ८० टक्के बेड राखीव ठेवण्याच्या संकल्पनेला कोरोना प्रादुर्भाव अधिक असणाऱ्या काळात फायदा झाला. हॉस्पिटल्सने ८० टक्के बेड्स उपलब्धतेबाबत दर्शनी भागात फलक लावतानाच महानगरपालिकेने निश्चित करून दिलेल्या दराप्रमाणे वैद्यकीय उपचार दिले गेले नसल्याच्या काही ठिकाणी तक्रारी आहेत. या तक्रारी दूर करण्यासाठी वैद्यकीय समिती गठीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
भारत बायोटेक प्रकल्प मिहानमध्ये यावा
भारत बायोटेक प्रकल्प नागपुरात मिहानमध्ये यावा तसेच नागपुरात फार्मा कंपनी आणण्यासाठी ठोस कृती आराखडा एक आठवड्यात सादर करावा, एअर लिक्विड फ्रांस ही कंपनी नागपुरात १०० मेट्रिक टन ऑक्सिजन प्लांट टाकण्यास इच्छुक आहे. तातडीने त्यांच्या समवेत चर्चा करून पुढील रोड मॅप निश्चित करण्याच्या सूचना पालकमंत्री राऊत यांनी विभागीय आयुक्तांना दिल्या.
म्युकरमायकोसिस औषधांबाबत एस.ओ.पी.निश्चित होणार
म्युकरमायकोसिस औषधांची मात्रा कशी असते, औषध किंमत, शस्त्रक्रिया खर्च आणि गोर-गरिबांसाठी माफक दरात कसे करता येईल. या क्षेत्रातील तज्ज्ञांचा एक गट तयार करून एस.ओ.पी.निश्चित करून सात दिवसात जिल्हा प्रशासन यासंदर्भात अहवाल देणार असल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी यावेळी सांगितले.