कामठी (नागपूर) : साेशल मीडियावर धर्मगुरूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व पाेस्ट प्रकरणात कामठी पाेलिसांनी एका १९ वर्षीय तरुणीस साेमवारी (दि. १३) अटक केली असून, अन्य दाेघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयाने आराेपी तरुणीस एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. या प्रकरणातील आराेपींना अटक करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रविवारी (दि. १२) रात्री कामठी शहरातील दाेन्ही पाेलीस ठाण्यांना घेराव केल्याने शहरात तणाव निर्माण झाला हाेता. साेमवारी शहरातील तणाव निवळला असून, जनजीवन सुरळीत हाेते.
कामठी पाेलिसांनी या प्रकरणात कामठी शहरातील काटी ओळ भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीस अटक केली असून, रौनीभाई उर्फ रौनक यादव व अमन मेमन दाेघेही (रा. कामठी) यांचा शाेध सुरू केला आहे. या तिघांविरुद्ध कामठी (नवीन) पाेलीस ठाण्यात भादंवि २९५, १५३, ३४, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी) अन्वये गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. आराेपी तरुणीला साेमवारी सकाळी कामठी शहरातील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने तिला एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली आहे. अन्य दाेन आराेपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास पाेलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या तिघांनी धर्मगुरूबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह संदेश पोस्ट केले हाेते. त्यामुळे त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अंदाजे पाच हजार नागरिक रविवारी (दि. १२) रात्री १० वाजताच्या सुमारास कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले हाेते. नागरिकांनी घाेषणाबाजी करीत कामठी (नवीन) व कामठी (जुनी) पाेलीस ठाण्याला घेराव केल्याने तसेच शहरातून जाणारा नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग अडवून धरल्याने तणाव निर्माण झाला हाेता.
पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह सर्व प्रमुख पाेलीस अधिकारी रविवारी रात्री कामठी शहरात दाखल झाले हाेते. अमितेश कुमार यांनी व्यवस्थित परिस्थिती हाताळत नागरिकांना शांत केल्याने मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास तणाव निवळला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य राखीव पाेलीस दल, अतिशीघ्रकृती दल तसेच नागपूर शहर व ग्रामीण पाेलिसांची अतिरिक्त कुमक बाेलावण्यात आली हाेती.
वाहनांसह हाॅटेलवर दगडफेक
संतप्त नागरिकांनी कामठी शहरातून गेलेला नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग अडविल्याने या महामार्गाच्या दाेन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या हाेत्या. या महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली हाेती. काहींनी मध्यरात्री महामार्गावरील वाहनांसह पाेलीस ठाण्यासमाेरील हाॅटेलवर दगडफेक केली हाेती. यात वाहने व हाॅटेलच्या काचा फुटल्या असून, कोणालाही दुखापत झाली नाही. पाेलीस उपायुक्त लाेहित मतानी, उपायुक्त (गुन्हे शाखा) चिन्मय पंडित, गजानन राजमाने, सहायक पाेलीस उपायुक्त नयन आलूरकर यांच्यासह पाेलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
संवेदनशील भागात पाेलिसांचा रूट मार्च
या पार्श्वभूमीवर नागपूर शहर पाेलिसांनी पाेलीस उपायुक्त लाेहित मतानी यांच्या नेतृत्वात साेमवारी शहरातील इस्माईलपुरा, विणकर कॉलनी, जयभीम चौक, कामगारनगर, लकडगंज, गवळीपुरा, जयस्तंभ चौक, हरदासनगर, हैदरी चौक, मोंढा, मोदी पडाव, राम मंदिर, कादर झेंडा, खलासी लाईन, संजयनगर, भाजी मंडी, बोरकर चौक, कोळसा टाळ, रब्बानी चौक, इमलीबाग, वारीसपुरा, फुटाना ओळ, फेरूमल चौक, शुक्रवारी बाजार, गोयल टाॅकीज चौक, महात्मा गांधी चौक, मेन रोड मार्गे रूट मार्च काढला. यात राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, अतिशीघ्रकृती दल तसेच सशस्त्र पाेलीस जवान सहभागी झाले हाेते.