लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - धान उत्पादकांना त्यांनी पिकविलेल्या धानावर बोनस देण्याऐवजी रोवणीच्या वेळी त्यांना अधिक गरज असल्याने त्यावेळी आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
पूर्व विदर्भातील धान उत्पादक टापूमध्ये दिला जाणारा बोनस हा सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विशेषत: काँग्रेसच्या लोकप्रियतेमधील मोठा मुद्दा आहे. लगतच्या छत्तीसगडमध्ये धानाला बोनसच्या मुद्यावरच काँग्रेसची सत्ता आली. या पृष्ठभूमीवर, महाराष्ट्र सरकारच्या धोरणामधील हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे. शेतकऱ्यांना धानरोवणीच्या वेळी आर्थिक मदतीची अधिक गरज असल्याने हा बदल केला जात असल्याचे वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे.
मागील वर्षी राज्यभरातील ज्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व गारपीट, वादळाचा फटका बसला होता, त्यांना राज्य सरकारने मदत केली असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी सांगितले. तथापि, अजूनही ४८५ कोटींची मदत देणे बाकी आहे. येत्या १५ दिवसात ती दिली जाईल, असे ते म्हणाले.