नागपूर : भाजपच्या २ मार्च रोजीच्या पहिल्या उमेदवार यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव आले नाही. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी गडकरींना महाविकास आघाडीत प्रवेशाची ऑफर दिली. त्यांचे कौतुकही केले. यामुळे नागपुरातील काँग्रेसजण दुखावले आहे. नागपुरात गडकरींच्या विरोधात काँग्रेस लढते व तुम्ही मुंबई पुण्यात बसून गडकरींचे कौतुक करता. तर मग आम्ही नागपुरात गडकरींच्या विरोधात कसे लढायचे, असा सवाल काँग्रेसजणांनी केला आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रील एकाही नेत्याचे नाव नाही. पण या यादीत गडकरींचे नाव नसल्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्रीय भाजपला लक्ष करणे सुरू केले आहे. पहिल्या यादीत कृपाशंकर सिंह यांचे नाव येते. आणि गडकरींचे येत नाही. भाजप सोडा. राजीनामा द्या. महाविकास आघाडीकडून लढा. आम्ही तुम्हाला निवडणून आणतो, अशी ऑफर उद्धव ठाकरे यांनी दिली. तर नितीन गडकरी हे विकासाला महत्व देतात. देशात जो विकास दिसतो त्यातील मोठे योगदान हे गडकरी सांभाळत असलेल्या विभागाचे आहे. अशा व्यक्तिला दिल्लीत पुन्हा संधी मिळायला हवी, असे संजय राऊत म्हणाले. गडकरी हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे नेते आहेत. ते कधीही विरोधकाला शत्रु समजत नाही. आम्ही त्यांचा मान सन्मान करतो, असे सांगत सुप्रिया सुळे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. या तीनही नेत्यांनी गडकरींचे कौतुक केल्यामुळे नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नागपुरातील स्थानिक काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, नागपुरात गडकरींच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार लढतो. गेल्यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वत: गडकरींविरोेधात लढले आहेत. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. अद्याप भाजपने गडकरींची तिकीट कापलेली नाही. आपण भाजप सोडतो आहे किंवा कुठलीही नाराजी गडकरींनी व्यक्त केलेली नाही. असे असताना महाविकास आघाडीतील नेत्यांनी उतावीळ होऊन गडकरींची प्रशंशा करणे कितपत योग्य आहे, असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केला आहे.
गडकरींनी प्रचारात हीच क्लिप वापरली तर....महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गडकरींची भरभरून प्रशंशा केली. त्याचे व्हिडिओ आता सोशल मिडियावर फिरत आहेत. उद्या, गडकरी हे भाजपचे उमेदवार झाले व त्यांनी महाविकास आघाडीचे नेते त्यांची प्रशंशा करीत असल्याची व्हिडिओ क्लीप प्रचारात वापरली, तर काँग्रेसच्या उमेदवाराने काय करायचे, असा सवालही काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.
चेन्नीथला यांच्याकडे नाराजी
महाविकास आघाडीतील नेत्यांनी गडकरींची प्रशंशा करणे टाळावे. तसेच त्यांच्या पक्षाकडून तशा सूचना द्याव्या, अशी नाराजी नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे व्यक्त केली आहे.