नागपूर : भंगार व्यावसायिकाला १३ लाखांची टोपी घालण्याचा प्रयत्न ऑफिस बॉयच्या अंगलट आला. पोलिसांनी त्याला अटक केली. विपुल राजेश पराते (वय १९, रा. मेहंदीबाग) असे आरोपीचे नाव आहे.
नंदनवनमधील रमना मारोती मंदिरजवळ राहणारे संकेत विजयराव मुरकुटे हे शांतीनगरात लालगंज पुलाजवळ भंगार व्यवसाय करतात. तीन-चार वर्षांपासून त्यांच्याकडे विपुल ऑफिस बॉय म्हणून काम करीत होता. संकेत यांचा विपुलवर खूप विश्वास होता. त्यामुळे मोठ-मोठ्या रकमेचे व्यवहार ते विपुलकडून करून घेत होते. गुरुवार, ७ एप्रिलच्या रात्री आठ वाजता संकेत यांनी विपुलजवळ १२ लाख ९४ हजार रुपये दिले. व्यावसायिक व्यवहार असलेले संकेत यांचे मामा सुरेश यांच्याकडे ती रोकड विपुलला नेऊन देण्यास सांगितले. विपूल संकेत यांच्याकडून निघाला आणि अर्ध्या तासातच त्याने संकेत यांना फोन केला. लालगंज पुलाजवळ आपल्यावर चार ते पाच आरोपींनी हल्ला करून रोकड हिसकावून नेल्याचे संकेतला सांगितले. हादरलेल्या संकेत यांनी विपुलला घेऊन शांतीनगर पोलीस ठाणे गाठले.
१२.९४ लाखांची रोकड हिसकावून नेल्याचे कळाल्याने पोलिसांनी लगेच धावपळ सुरू केली. संकेतला घेऊन घटनास्थळ गाठले. घटनेसंबंधाने अनेकांना विचारपूस केली. घटनेबाबत कुणीही वाच्यता केली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र, तशी कोणतीही घटना घडल्याचे त्यात दिसून येत नव्हते, त्यामुळे पोलिसांनी विपुलचीच चाैकशी सुरू केली. प्रश्नांची सरबत्ती होताच विपुल गडबडला.
केले स्वतःला जखमी
१३ लाखांची रोकड पाहून विपुलची मती फिरली. त्याने ती रोकड हडपण्याचे मनसुबे रचले. त्यानुसार, ही रोकड स्वत:च्या घरी जाऊन लपवून ठेवल्यानंतर लुटमार झाल्याचा कांगावा केला. तो खरा वाटावा म्हणून स्वत:च स्वत:च्या हाताला ब्लेडने चिराही मारून घेतल्याचे पोलिसांसमोर कबूल केले. पोलिसांनी त्याच्या घरातून रोकड जप्त केली. त्याला कलम ४०८ नुसार गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.
---