नागपूर : वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वसुलीत व्यस्त राहतात. त्यामुळे इतवारी, महाल, सीताबर्डी तसेच सदर बाजारात जागोजागी हॉकर्स आणि दुसऱ्या नागरिकांनी ताबा घेतला आहे. हॉकर्स आणि अवैध वाहतुकीच्या वसुलीत अडकले असल्यामुळे ते रस्ते अपघातांवर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत करण्यात अयशस्वी ठरत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी गुन्हे शाखेच्या बैठकीत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना फटकारून सात दिवसात परिस्थिती सुधारण्याचे आदेश दिले आहेत. तसे न झाल्यास अधिकाऱ्यांची बदली करण्याची तंबी दिली आहे. सूत्रांनुसार शहराच्या बहुतांश बाहेरील मार्गावर वाळुतस्करांचा ताबा आहे. ग्रामीण भागातून वाळु आणून ते शहरातील मार्गाने रवाना होतात. रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत त्यांचा व्यवसाय सुरू असतो. ही वाहने वेगाने धावतात. त्यामुळे अनेकदा अपघातही होतात. अवजड वाहनांमुळे अनेक ठिकाणचे रस्ते खराब झाले आहेत. वाहतूक शाखेने शासकीय कामाच्या आड अनेक वाहनांना विशेषत्वाने सुट दिली आहे. प्रत्येक सुट देण्याच्या मोबदल्यात ते वसुली करतात. या कामासाठी विशेष कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. ते वाळु तस्करांकडून महिन्याकाठी लाखो रुपयांची वसुली करतात. यामुळे शहरातील प्रमुख बाजारांची अवस्था बिकट झाली आहे. इतवारी आणि महालमध्ये तर अनेक ठिकाणी पायी चालणेही कठीण होते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला हातठेल्यांच्या लांब रांगा लागतात. गांधीबाग, नंगापुतळा, सिटी पोस्ट ऑफिस, महालमध्ये हॉकर्स तसेच नाश्त्याच्या ठेल्यांकडून दर महिन्यात लाखोची वसुली करण्यात येते. इतवारीत अनेक किराणा आणि धान्याचे व्यापारी पहाटे ट्रकमधून गोदामात माल उतरवितात. त्यांच्याकडून वाहतूक पोलीस पहाटेच वसुली करण्यासाठी पोहोचतात. इतवारी, महालमध्ये पार्किंगची समस्या गंभीर झाली आहे. नागरिक नाईलाजास्तव रस्त्याच्या बाजूने वाहने उभी करतात. चारचाकी वाहनांवर जामरची कारवाई करण्यात येते. त्याचा दंड २५० रुपये आहे. १०० ते १५० रुपये घेऊन जामर काढण्यात येते. त्यामुळे जामरची कारवाई खूप कमी होते.
............
हॉकर्सच सांभाळतात कलेक्शन
हॉकर्स समूहात एका व्यक्तीचा कलेक्शनची जबाबदारी सोपविण्यात येते. तो व्यक्ती इतरांकडून वसुली करून कर्मचाऱ्यांना सोपवितात. इतवारीच्या नंगा पुतळा येथे बाबा तसेच पोस्ट ऑफिसजवळ जीया हे कलेक्शन करून किशोरला देतो. बहुतांश हॉकर्सकडून याच पद्धतीने वसुली करण्यात येते.
...........