नागपूर : पूर्णपणे शिजलेले चिकन व उकळलेली अंडी खाणे सुरक्षित आहे व त्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता वाढते, हे लाेकांना पटवून देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष चिकन आणि उकळलेली अंडी खाऊन दाखविले. नागरिकांच्या मनात बर्ड फ्लूबाबत पसरलेला संभ्रम व भीती दूर करण्यासाठी या अनाेख्या उपक्रमाचे आयाेजन शुक्रवारी करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद, नागपूर व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा खिकन खाण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचेे पशुसंवर्धन व दुग्ध शाळा समितीचे सभापती तापेश्वर वैद्य, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डाॅ. के.एस. कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डाॅ. मंजूषा पुंडलिक, पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डाॅ. अजय पाेहरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. युवराज केने तसेच जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित हाेते. डाॅ. कुंभरे यांनी बर्ड फ्लूच्या अफवेची भीती मनातून काढण्याचे आवाहन केले. मात्र, कच्चे मांस हाताळताना काळजी घेणे तसेच काेंबड्यांची मरतुकी असेल, तर पशुसंवर्धन विभागाला सुचित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कुक्कुट प्रक्षेत्रांना भेटी देउन राेगाच्या प्रादुर्भाव आटाेक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. संचालन डाॅ. राजेंद्र रेवतकर यांनी केले.
कुक्कुट पालक शेतकऱ्यांना सुचना
- राेगीट पक्ष्यांची विष्टा व नाकातील स्राव यांच्याशी संपर्क टाळावा.
- पक्ष्यांना शक्यता हाताळू नका व हाताळल्यास हात साबणाने स्वच्छ करा.
- पक्ष्यांचे खाद्य, पाणी घराबाहेर उघड्यावर ठेवू नका.
- परिसरात इतर प्रजातीचे पक्षी, प्राणी येणार नाही, याची काळजी घ्या.
- कुक्कुट मांस व अंडी विक्रेत्यांनी स्वच्छतेचे पालन करावे.